'फुलराणी....अविस्मरणीय प्रेमकहाणी'
दिवाळीत दरवळणार 'फुलराणी'चा गंध
'पिग्मॅलिअन' वर आधारित 'माय फेअर लेडी' हा संगीतमय चित्रपट जगभर खूप गाजला होता. त्याच कलाकृतीने प्रेरित होऊन 'फुलराणी....अविस्मरणीय प्रेमकहाणी' हा मराठी चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विश्वास जोशी करत असून चित्रपटातून एक अनोखी फुलराणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी नाटकातील फुलराणीवर प्रचंड प्रेम केलं. परंतु, चित्रपटातील फुलराणी कशी असणार? कोण असणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता पहायला मिळतेय. येत्या दिवाळीत या ‘फुलराणी’चा गंध महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत दरवळणार आहे. त्यासाठीच निर्मात्यांनी नववर्षारंभीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.
तिकीटबारीवर यशस्वी ठरलेल्या ‘नटसम्राट’, ‘What’s up लग्न’ या चित्रपटांनंतर विश्वास जोशी यांच्या ‘फुलराणी’ कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत. सर्वस्वी नव्या स्वरूपातील ‘फुलराणी’ प्रेक्षकांना या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. यातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही मुख्य भूमिका प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे साकारणार आहेत. चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असली तरी प्रेमाचा अविस्मरणीय अविष्कार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळेल, असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात.
‘फिनक्राफ्ट मिडिया प्रोडक्शन’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मीती जाई विश्वास जोशी आणि अमृता अरुण राव यांनी केली आहे. या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. चित्रपटाची गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आहेत, रंगभूषा संतोष गायके तर वेशभूषा सायली सोमण यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. मिलिंद शिंगटे आणि आनंद गायकवाड चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
Comments
Post a Comment