मराठी माणसांचं मराठी रसिकांसाठी मराठी ॲप ‘तिकिटालय’
मराठी माणसांचं मराठी रसिकांसाठी मराठी ॲप ‘तिकिटालय’
मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत प्रशांत दामले यांनी केली नव्या ॲपची घोषणा
मराठी सिनेमा,नाटक,गाण्यांचे-कवितांचे
मराठी मनोरंजनाचे तिकीट काढणाऱ्या रसिकांना भरपूर माहितीसह एखादं हक्काचं तिकीट बुकिंग ॲप हवं, या जिद्दीने प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे, अभिजित कदम यांनी एकत्र येत पीएसी थिएटर एंटरटेनमेंट प्रा. लि (PAC) अंतर्गत हे ‘तिकिटालाय’ॲप मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत सादर केलं आहे. मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ, ज्येष्ठ निर्माता -दिग्दर्शक महेश कोठारे व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘तिकिटालय’ या मनोरंजनात्मक तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आला. प्रेक्षकांना या ॲपवर हव्या त्या मराठी कार्यक्रमाचं तिकीट घरबसल्या बुक करता येणार आहे.
थेट तिकीट काढणाऱ्या प्रेक्षकांना सिनेमा, नाटक व इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांची संपूर्ण माहिती एकाच प्लॅटफॉर्मवरून पुरवली तर त्याचा फायदानक्की होईल. या ॲपमुळे जगभरातील मराठी प्रेक्षक मोठया प्रमाणात जोडला जाईल. प्रेक्षक त्याच्या आवडीचं सहज शोधेल आणि अवघ्या ३ किल्कवर संपूर्ण माहिती घेऊन तिकीट बुक करू शकेल अशा रीतीने ‘तिकिटालाय’ ॲपची मांडणी केली आहे. संपूर्ण भारतात हा ॲप कोणीही डाऊनलोड करू शकतो.
‘तिकिटालय’बद्दल प्रशांत दामले म्हणाले, ‘मराठी करमणुकीच्या क्षेत्रासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून माझ्या डोक्यात होती. त्यामुळे ‘तिकिटालय’ या ॲपची संकल्पना मला सुचली. मराठी निर्मात्यांना देखील हे ॲप खूप सोयीचं आहे. मराठी सिनेमा, नाटक याशिवाय या ॲपवर प्रेक्षकांना फक्त मराठी कलाकृती विषयकच माहिती मिळेल’ याचा फायदा जास्तीतजास्त निर्मात्यांनी घेण्याचे आवाहन ही प्रशांत दामले यांनी यावेळी केले.
‘मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा आग्रह मी नेहमीच धरला आहे. नवनव्या संकल्पना येणं खूप गरजेचं आहे.‘तिकिटालय’ ची संकल्पना नक्कीच स्तुत्य असून याचा फायदा करून घेणं महत्त्वाचं असल्याचं राजसाहेब ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितलं. ‘गरज शोधा आणि पुरावा’ असं मला नेहमी वाटते त्यानुसार प्रशांत दामले यांनी मनोरंजन क्षेत्राची आजची गरज ओळखून आणलेलं ‘तिकिटालय’ खरंच कौतुकास्पद असल्याची भावना महेश कोठारे यांनी व्यक्त केली. मराठी प्रेक्षकांसाठी हा उपक्रम, हे ॲप नक्कीच उपयुक्त ठरेल’, असं सांगत या नव्या ॲपला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
या शुभारंभ सोहळ्याला मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आवर्जून उपस्थित होते.
Comments
Post a Comment