नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रावण कॅालिंग’

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'रावण कॉलिंग'
९ जानेवारीला होणार प्रदर्शित...
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पहिली झलक प्रदर्शित
मराठी पडद्यावर लवकरच एका थ्रिलर, कॅामेडी  सिनेमाची एंट्री होणार असून येत्या नवीन वर्षात म्हणजेच ९ जानेवारी २०२६ मध्ये ‘रावण कॉलिंग’ हा धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

पोस्टरमध्ये लालसर पार्श्वभूमीवर आगीच्या ज्वाळांमध्ये जळणारी रावणाची मूर्ती दाखवण्यात आली आहे. धगधगत्या आगीतून उमटणारी ही छबी प्रेक्षकांना एका अनोख्या आणि रोमांचकारी प्रवासाची चाहूल देणारी आहे.

गोल्डन गेट प्रॅाडक्शन निर्मित आणि मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी एकत्रितपणे सांभाळली आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा सुपुत्र अभिषेक गुणाजी या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. यात सचित पाटील, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, गौरव घाटणेकर, रवी काळे आणि मिलिंद गुणाजी अशी दिग्गज कलाकारांची मोठी फौज झळकणार आहे. 

दिग्दर्शक अभिषेक गुणाजी म्हणाले, ‘’हा माझा पहिलाच दिग्दर्शनाचा अनुभव आहे. ‘रावण कॉलिंग’ अनेक सरप्राईजेसने आणि ट्विस्ट्स ॲण्ड टर्न्सने भरलेला आहे. जबाबदारी खूप मोठी आहे, परंतु मी शंभर टक्के त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रतिसाद मिळण्याची आतुरता आहे.”

दिग्दर्शक संदीप बंकेश्वर म्हणाले, ‘’ विषय वेगळ्या धाटणीचा असून हा एक धमाल चित्रपट आहे. अशा ताकदीच्या आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करणं हा अविस्मरणीय अनुभव होता. आम्हाला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच भावेल.”

जरी कथानक अद्याप गुप्त ठेवण्यात आले असले तरी, हा एक कॅामेडी, थ्रिलर आणि प्रत्येक वळणावर काहीतरी ट्विस्ट्स घेऊन येणारा चित्रपट आहे.  यातील दमदार कलाकारांची एकत्रित कामगिरी प्रेक्षकांना एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव देणार हे निश्चित आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025