प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे एक संवेदनशील विषय 'न आवडती गोष्ट'
प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे एक संवेदनशील विषय 'न आवडती गोष्ट'
प्लॅनेट मराठी दरवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेत असते. प्लॅनेट मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी घेऊन आले आहे नवीन चित्रपट 'न आवडती गोष्ट'. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पहिल्यांदाच LGBTQ या संवेदनशील विषयावर भाष्य करण्यात आले आहे. यात एका कुटुंबातील दोन बहिणींतील नात्याच्या प्रवासाची गोष्ट दिसणार आहे. समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट, अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, इएस प्रोडक्शन अंतर्गत, अमित मल्होत्रा, कपिल मल्होत्रा आणि प्रशांत सुराणा निर्मित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सई देवधर यांनी केले असून यात मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, रेशम श्रीवर्धन आणि सायली संजीव, उदय टिकेकर, उषा नाईक, स्नेहा रायकर, वर्षा घातपांडे, निखिल रत्नपारखी, सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बदलत्या काळानुसार आजकाल अनेक संवेदनशील विषयांची समाजामध्ये मोकळेपणाने चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे. समलैंगिकता हा त्यापैकीच एक विषय. सध्या महाराष्ट्रात समलैंगिक संबंधांवर मान्यता मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात वारंवार मागणी करण्यात येत असून, अजूनही त्या मागणीची पूर्तता झाली नाही. तरीसुद्धा यासारखा संवेदनशील विषय प्लॅनेट मराठी हाताळत आहे. आजही मध्यमवर्गीय कुटुंब ही परिस्थिती पचवू शकत नाही. असे असताना जर एखाद्या सामान्य कुटुंबात अशी घटना घडलीच तर ते कुटुंब ही परिस्थिती कशी हाताळेल. त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल, संपूर्ण कुटुंब कसे शेवटपर्यंत एकत्र राहणार, हे या सिनेमात हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. विनोदी चित्रपटाच्या माध्यमातून एक संवेदनशील विषयावर विचार करण्यास भाग पाडणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शिका सई देवधर म्हणतात, "'न आवडती गोष्ट' या चित्रपटात LGBTQ हा अतिसंवेदनशील विषय मराठी प्रेक्षकांसमोर घेऊन आलो असून, या चित्रपटाचा विषय नाजूक असल्यामुळे तो विनोदी पद्धतीने मांडणे हे फार आव्हानात्मक होते. हा चित्रपट सरळ सोप्या पद्धतीने प्रेक्षकांना हसवत खूप गोष्टी सांगून जाईल. संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा असा हा सिनेमा आहे."
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय विलास बर्दापूरकर म्हणतात; "प्लॅनेट मराठीने नेहमीच वेगवेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणले आहेत. प्रत्येक विषय आधी केलेल्या विषयापेक्षा वेगळा असावा, याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो. 'न आवडती गोष्ट' या चित्रपटात LGBTQ या संवेदनशील विषयावर भाष्य केले आहे. समलैंगिकता या विषयाचे गांभीर्य कुठेही न ढासळू देता हा विषय विनोदी पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणला आहे. संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन हा चित्रपट नक्कीच करेल."
Comments
Post a Comment