ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे 'माणिक रत्न' पुरस्काराने सन्मानित

हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष :  अश्विनी भिडे-देशपांडे

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे 'माणिक रत्न' पुरस्काराने सन्मानित

'पद्मश्री’ ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. याकरिता हे वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी’ २०२५-२०२६ म्हणून साजरं केलं जाणार आहे. या जन्मशताब्दीचे  औचित्य साधत आयोजित एका विशेष कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांचा सन्मान सुप्रसिद्ध तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. तुळशी वृंदावनचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत अत्यंत प्रतिष्ठेचा 'माणिक रत्न' पुरस्कार अश्विनी भिडे-देशपांडे यांना याप्रसंगी प्रदान करण्यात आला. वंदना गुप्ते, भारती आचरेकर,अरुणा जयप्रकाश, राणी वर्मा आणि चौरंगचे अशॊक हांडे यावेळी मंचावर उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गायिका अश्विनी भिडे-देशपांडे म्हणाल्या कि, ‘ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार खरंच आनंददायी आहे. माणिक वर्मा यांच्या सोबत माझं वेगळं नातं होतं, त्यामुळे त्यांच्या या ‘स्वरोत्सवात’ माझा हा सन्मान होणं मी भाग्याचं समजते’. 'ज्यांच्याकडे पहावं आणि त्यांना आदर्श घ्यावा’ असं व्यक्तिमत्त्व म्हणजे माणिक वर्मा. त्यांच्या कुटुंबाकडून प्रेमाचा वारसा मला आजही मिळतोय यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आजवर अनेक पुरस्कार मिळाले पण हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. शब्दांतही व्यक्त करता येणार नाही इतका हा पुरस्कार मोलाचा असून या प्रेमासाठी मी ऋणी आहे'. 

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या आठवणींना उजाळा देताना सुप्रसिद्ध तालयोगी पं.सुरेश तळवलकर म्हणाले कि, ‘तुमच्याकडे जर चांगलं वागण्याचा स्वभाव नसेल तर कोणतीही कला रुजू शकत नाही. माणिकताईंचा स्वभाव नम्र असल्याने अनेकांना त्यांनी आपलंस केलं. आपल्या याच नम्र स्वभावामुळे माणिकताईंनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आजही एवढ्या मोठ्या संख्यने उपस्थित असलेले रसिक ही त्यांच्यावरील प्रेमाची व त्यांच्या कलेच्या यशाची पावती आहे’. 

‘माणिक मोती' या कार्यक्रमाचे लेखन-दिग्दर्शन करणारे चौरंगचे अशॊक हांडे यांनी सांगितले कि, आपल्या कलेचा ठसा उमटविणाऱ्या जुन्या व्यक्तिमत्वांची आठवण आपण ठेवायलाच हवी. ‘प्रेरणा’ म्हणून आणि ‘शिकण्यासाठी’ आपल्याला या दिग्गज मान्यवरांनी दिलेला वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेणं महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमासाठी मी बरंच संशोधन केलं असून माणिकताईंच्या या चारही लेकींची मला तितकीच उत्तम साथ लाभली यासाठी मी त्यांचा आभारी राहीन.    

या पुरस्कार सोहळ्यानंतर चौरंगचे अशॊक हांडे आणि माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे माणिक वर्मा यांच्या जीवनावरील ‘माणिक मोती’ हा कार्यक्रम  सादर झाला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी हा कार्यक्रम पुरस्कृत केला होता. यावेळी  गायिका माणिक वर्मा यांची एकाहून एक सरस गीते ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. या मैफिलीला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी वर्मा यांनी केले.

जयपूर-आत्रोली ख्याल गायिकेच्या परंपरेतील उत्कृष्ट गायिका म्हणून अश्विनी भिडे-देशपांडे यांची संपूर्ण जगात ओळख आहे. त्यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण पंडित नारायणराव दातार यांच्याकडे झाले. त्यानंतर आपली आई माणिक भिडे यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम त्यांनी घेतली. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा हे उपशास्त्रीय गायन प्रकारसुद्धा त्या गातात. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक स्तोत्रे, स्तुती यांचे गायन केले आहे. त्यांनी स्वतः अनेक बंदिशी रचल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K