*दशावतार’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकला आंतरराष्ट्रीय प्रतिसाद*

अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सकडून भरभरून कौतुक

मराठी चित्रपट ‘दशावतार’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर आता या भव्य चित्रपटाबाबतची चर्चा भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुरू झाली आहे. अमेरिकेतील 'अवर स्टुपिड रिॲक्शन' या लोकप्रिय यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सनी ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकवर प्रतिक्रिया देत, या चित्रपटाचा सकारात्मक पद्धतीने आढावा घेतला आहे. त्यांनी टीझरमधील दृश्यसौंदर्य, भव्य सेट्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि संकल्पनेचं विशेष कौतुक केलं आहे. 

जगभरातील चित्रपटांविषयी सांगोपांग चर्चा करणारे अमेरिकेतील प्रसिद्ध  समीक्षक/कंटेंट क्रिएटर कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांनी म्हटलं आहे की, “हा टीझर एखाद्या हॉलिवूड दर्जाच्या पौराणिक चित्रपटासारखा भासत आहे. मराठी चित्रपट अशा पातळीवर बनत असल्याचे पाहून खूप आनंद झाला.” सध्या या टीझरचे रिॲक्शन व्हिडिओज सर्वत्र व्हायरल होत असून ‘दशावतार’बद्दलची उत्सुकता मर्यादित प्रेक्षकांपुरती न राहाता, आता ग्लोबल ऑडियन्सपर्यंत पोहोचत आहे.

कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांच्या कार्यक्रमात चर्चिला जाणारा 'दशावतार' हा पहिलाच मराठी आणि किंबहुना पहिला भारतीय प्रादेशिक चित्रपट असावा. मराठी भाषा आपला अटकेपार झेंडा मिरवत असतानाच मराठी चित्रपटदेखिल आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवत आहे, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद बाब आहे.

झी स्टुडियोज् प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित “दशावतार” हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग, तिथल्या रूढीपरंपरा, मान्यता, लोककला यांचं मनोरम्य दर्शन घडवणारा आणि तितकीच त्याला गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान, थरारकथेची जोड असलेला हा चित्रपट आहे.  दिलीप प्रभावळकर यांची या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी  केली आहे. तर चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे असून कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर दशावतार चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे. येत्या १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K