*'पुन्हा शिवाजीराजे भोसले' येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला*

*विठ्ठ्ल रखुमाईचा आशीर्वाद घेत पहिली झलक प्रदर्शित*

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका नव्या आणि समकालीन रूपात! ज्या चित्रपटाची इतके दिवसांपासून चर्चा होती तो  ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आली आहे. महेश मांजरेकर यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेत, चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या भव्य चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं असून, निर्मितीची धुरा राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारत असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रभावी टीझरमध्ये त्यांच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसर देखील झळकली आहे.

टीझरमध्ये ऐकू येणारे 'राजं… राजं' हे बोल ज्या ऊर्जेने, ज्या भावनांनी भरलेले आहेत, ते थेट काळजाला भिडतात. सिद्धार्थ बोडकेच्या संवादांमधून केवळ इतिहासाची आठवण होत नाही, तर मनात नवी उमेद, ऊर्जा आणि प्रेरणा संचारते. शिवरायांच्या झंझावाती व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यागमय नेतृत्वाचं दर्शन घडवणाऱ्या या टीझरमधील दृश्यं आणि संवाद हे अंगावर शहारे आणणारे आहेत.या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ ऐतिहासिक पुनरावलोकन न होता, आधुनिक काळातील समाजाला भिडणारा विचारप्रवाह पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

याविषयी दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात: “शिवाजी महाराज ही केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नसून ते एक विचार आहेत. हा विचार आज अधिक आवश्यक आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट म्हणजे इतिहासाकडे मागे वळून पाहाणं नाही, तर शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात आजचा अंधार उजळवण्याचा प्रयत्न आहे. समाजात निर्माण झालेल्या निराशा, उदासीनता, आणि दिशाहीनतेच्या गर्तेत आपण पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या मूल्यांकडे वळणं गरजेचं आहे. हा सिनेमा त्या जाणिवेचा आवाज आहे..’’

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट भूतकाळात रमणारा नाही, तर आजच्या समाजाला जागं करणारा ठरणार आहे. शिवाजी महाराजांचे विचार आणि तत्वं या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सशक्त माध्यमातून साकारलेला प्रयत्न आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K