‘पण या इगो चं’ मधून नात्यातील अहंकारावर भाष्य

'बिन लग्नाची गोष्ट'मध्ये प्रिया बापट, भारती आचरेकर यांनी गायलं गाणं 

नात्यांची नवी परिभाषा सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच यातील नवं गाणं ‘पण या इगो चं’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, या गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यासोबतच कधी कधी डोकावणारा अहंकार या गाण्यातून व्यक्त होत आहे. वैभव जोशी  यांचे अर्थपूर्ण शब्द आणि संगीतकार निनाद सोलापूरकर यांचे जबरदस्त संगीत यामुळे हे गाणं विशेष ठरतं. या गाण्याची खासियत म्हणजे प्रिया बापट आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी हे गाणं एकत्र गायलं आहे. भारती आचरेकर यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी गाणं गायलं असून त्यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. नात्यांमधील कोमल तरीही नाजूक सत्य अधोरेखित करणारं हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील नात्यांची आठवण करून देणारं आहे.

गाण्यातून निवेदिता सराफ आणि प्रिया बापट यांच्या नात्यातील तणाव, संवादाऐवजी वाढलेलं मौन आणि त्यातून निर्माण झालेल्या अहंकाराचं प्रभावी चित्रण दिसतं. प्रत्येक नात्यात प्रेम असतं, परंतु कधी कधी त्यापेक्षा ‘इगो’ला जास्त जागा मिळते. नात्यात प्रेम मोठं की अहंकार? हा प्रश्न या गाण्यातून अधोरेखित होत असून या प्रवासाचा शेवट नेमका कुठे होईल, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच उलगडणार आहे.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, '' 'पण या इगो चं' हे गाणं म्हणजे आजच्या नात्यांवर एक वास्तवदर्शी भाष्य आहे. नात्यात प्रेम, आपुलकी असतेच, पण त्यासोबत थोडा इगो, थोडे हट्ट, थोडी नोकझोकही असते. हे गाणं त्याचं चित्रण करतं. खास करून प्रिया बापट आणि भारती आचरेकर यांच्या आवाजामुळे गाण्यातील या भावना अधिक जिवंत झाल्या आहेत. संगीतकार निनाद सोलापूरकर यांनी दिलेल्या संगीतानं गाण्याला सुंदर सहजता मिळाली आहे. माझ्या मते, हे गाणं ऐकताना प्रेक्षकांना स्वतःची आणि आपल्या नात्यांची आठवण नक्कीच येईल आणि हीच त्या गाण्याची खरी ताकद आहे.”

निर्माते नितीन वैद्य म्हणाले, '' 'बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक नात्यात घडणाऱ्या भावनांना साकारतो. ‘पण या इगो चं’ या गाण्याच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना नात्यातील काही नाजूक क्षणांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं ऐकल्यानंतर प्रेक्षकांना स्वतःच्या नात्यांचा वेध घ्यावासा वाटेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट नात्यांचा आरसा ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025