मुंबईच्या त्वेशा जैनची उंच भरारी..राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक

      मुंबईच्या त्वेशा जैनची उंच भरारी,

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत कांस्य पदक

मुंबई-- मुंबईच्या त्वेशा जैन हिने अहमदाबाद येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सात वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. अनेक मानांकित खेळाडूंवर मात करीत तिने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

या स्पर्धेमध्ये २३ राज्यांमधील शंभरहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये यापूर्वी या गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या काही खेळाडूंचाही समावेश होता. त्यामुळेच यंदा ही स्पर्धा अतिशय आव्हानात्मक झाली होती. त्वेशा हिने अकरा फेऱ्यांमध्ये साडेआठ गुणांची कमाई केली. सहाव्या फेरीत तेलंगणाच्या अमेया अग्रवालविरुद्ध तिने मिळविलेला विजय या स्पर्धेतील आश्चर्यकारक विजय मानला गेला. चार तासांच्या झुंजार लढतीनंतर त्वेशा हिने हा डाव जिंकला. पदक जिंकण्यासाठी शेवटच्या फेरीत त्वेशा हिला विजय अनिवार्य होता. या फेरीत तिच्याविरुद्ध उत्तर प्रदेशच्या संस्कृती यादव (ईएलओ १२५६) हिचे आव्हान होते. शेवटपर्यंत संयम चिकाटी आणि जिद्द याचा समन्वय ठेवीत त्वेशा हिने हा डाव जिंकून कास्यपदकावर नाव नोंदविले. ही स्पर्धा जरी आव्हानात्मक होती तरीही या स्पर्धेसाठी तिने भरपूर सराव केला होता. त्यामुळेच तिला पदक मिळवण्याची खात्री होती.  

त्वेशा हिने साडेतीन वर्षांची असताना बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. तिला तिचे वडील आषिश आणि आजोबा रमेश यांच्याकडूनच बुद्धिबळाचे बाळकडू लाभले आहे. त्यानंतर तिला ज्येष्ठ प्रशिक्षक वीरेश तामिरेड्डी यांचे मार्गदर्शन मिळत आहे. दररोज चार ते पाच तास ती सराव करते. स्पर्धात्मक डावपेच, बुद्धिबळाविषयी वेगवेगळी कोडी सोडविणे, योगासने व ध्यानधारणा याचा देखील तिच्या सरावात समावेश आहे. मुंबई येथील ग्रीन लॉन्स प्रशालेत ती शिकत आहे. शाळेकडून तिला या खेळासाठी भरपूर सहकार्य मिळत आहे. 

आक्रमण हाच उत्कृष्ट बचाव असतो हे तत्व डोळ्यासमोर ठेवीत ती नेहमी लढती खेळत असते. झटपट आकलन शक्ती ही तिची खासियत असल्यामुळे अभ्यास असो किंवा बुद्धिबळाचे डावपेच सर्वच गोष्टी ती अल्प वेळेतच आत्मसात करीत असते. त्वेशा हिने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या अनेक स्पर्धांमध्ये पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. अनेक विश्व विजेते पद मिळवणारा मॅग्नस कार्लसन हा तिचा आदर्श खेळाडू असून त्याच्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याचे तिचे ध्येय आहे. त्याकरिता भरपूर मेहनत करण्याची तिची तयारी आहे. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K