जागतिक रंगकर्मी दिवस
जागतिक रंगकर्मी दिवस
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही मराठी नाट्य कलाकारांची मातृसंस्था असून "मराठी नाट्य कलाकार संघ" ही नाट्य परिषदेची व्यावसायिक रंगभूमीवरील रंगकर्मीसाठी कार्य करणारी अधिकृत घटक संस्था आहे.
रंगभूमीवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या सक्रिय रंगकर्मीचाही हक्काचा एक दिवस असावा, या दिवशी सर्व रंगकर्मींच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्दिष्टाने रंगभूमीवर सर्वस्व वाहीलेल्या भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून "२५ नोव्हेंबर" हा दिवस "जागतिक रंगकर्मी दिवस" म्हणून २०१४ साला पासून कलाकार संघाच्या वतीने साजरा केला जातो, यानिमित्त रंगभूमीवर ज्यांनी अनमोल कार्य केले आहे अश्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मीचा सन्मान करण्यात येतो, आतापर्यंत भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान व शोभा प्रधान, गंगाराम गव्हाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ आणि उषा नाडकर्णी या ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवर रंगकर्मीचा सन्मान करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली आहे.
यंदाही २५ नोव्हेंबर २०२३ रोजी यशवंत नाट्य संकुल माटुंगा येथे सायं. ६.३० वाजता नववा जागतिक रंगकर्मी दिवस" आयोजित करण्यात आला आहे, यावर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांच्या कारकिर्दीला मानवंदना म्हणून त्यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जयंती आणि विद्याधर गोखले आणि पं राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त सांगीतिक आदरांजली वाहण्यात येणार आहे, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुकुंद मराठे, निलाक्षी पेंढारकर, ज्ञानेश पेंढारकर, अमेय आखवे, केदार भागवत, सुहास चितळे हे कलाकार सहभागी होणार असून सोबत सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचे रंगतदार किस्से ऐकायला मिळणार आहेत, श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांच्याशी समीरा गुजर ह्या दिलखुलास गप्पांद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी नाटय सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कलाकार संघाचे अध्यक्ष श्री. सुशांत शेलार यांनी दिली. जागतिक रंगकर्मी दिवसाचा हा सोहळा सर्व कलाकारांनी एकत्र येऊन साजरा करावा हे आवाहन केले.
Comments
Post a Comment