हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या 'नवरोबा'ची वाट

'कन्नी' मधील रॅप साँग प्रदर्शित

८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या 'कन्नी' चित्रपटाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हे एक जबरदस्त रॅप साँग असून 'नवरोबा' असे या गाण्याचे बोल आहेत. यात हृता दुर्गुळे तिच्या जोडीदाराची आतुरतेने वाट पाहात असल्याचे दिसतेय. पुन्हा पुन्हा ऐकावे अशा या गाण्याला ज्योती भांडे आणि सीज़र यांनी गायले असून चैतन्य कुलकर्णी यांचे कमाल बोल या गाण्याला लाभले आहेत. तर एग्नेल रोमन यांनी जबरदस्त संगीत दिले आहे. गाण्यात हृतासोबत शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहरही दिसत आहेत. 

या गाण्यात मित्रांमध्ये असतानाही हृताची नजर तिच्या आयुष्यात येणाऱ्या 'नवरोबा'च्या शोधात दिसत आहे. फार आतुरतेने ती तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवऱ्याची वाट पाहात असून संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मुलात ती 'नवरोबा' शोधतेय. हृताचा हा 'नवरोबा' शोध संपणार का, याचे उत्तर प्रेक्षकांना ८ मार्चला मिळणार आहे. 

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत. 

या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, " हा मैत्री, प्रेम, स्वप्ने यांभोवती फिरणारा चित्रपट आहे, त्यामुळे त्यातील गाणीही तितकीच एनर्जेटिक असावी, असे मला वाटत होते आणि 'नवरोबा'च्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली. या गाण्याची संपूर्ण टीम अफलातून आहे. चैतन्यचे बोल आणि  एग्नेल रोमनचे उत्स्फूर्त संगीत या गाण्यात प्रचंड ऊर्जा आणत आहेत. त्यात ज्योती भांडे आणि सीजर यांची गायकी. सगळेच मस्त जमून आले आहे. रेकॉर्डिंग करताना आम्ही हे गाणे खूप एन्जॉय केले. मला खात्री आहे संगीतप्रेमींच्या ओठांवर हे गाणे रेंगाळेल.''

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025