भारतीय पेंट उद्योगात वाढ साधण्यासाठी ‘जेएसडब्ल्यू पेंट्स’कडून धोरणात्मक पाऊल
भारतीय पेंट उद्योगात वाढ साधण्यासाठी ‘जेएसडब्ल्यू पेंट्स’कडून धोरणात्मक पाऊल
‘अॅक्झो नोबेल इंडिया’चे अधिग्रहण करण्यासाठी करारावर स्वाक्षरी
मुंबई, २७ जून २०२५ : जेएसडब्ल्यू पेंट्स लिमिटेड या कंपनीने आज अॅक्झो नोबेल इंडिया लिमिटेड या कंपनीमधील ७४.७६ टक्के हिस्सेदारी विकत घेण्यासाठीचा एक करार केला आहे. ही हिस्सेदारी अॅक्झो नोबेल एन.व्ही. व तिच्या संलग्न कंपन्यांकडून खरेदी केली जाणार असून, त्याअंतर्गत होणारी शेअर खरेदी जास्तीत जास्त ८,९८६ कोटी रुपयांची असेल. यामध्ये काही अंतिम टप्प्यांवरील समायोजनांचा समावेश राहील ("प्रस्तावित व्यवहार").
या प्रस्तावित व्यवहारास भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी आवश्यक असणार आहे. तसेच ‘अॅक्झो नोबेल’च्या सर्वसामान्य भागधारकांसाठी त्यात ओपन ऑफरदेखील असणे आवश्यक आहे.
जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी पेंट्स कंपनी आहे. २३ अब्ज डॉलरची मालमत्ता असणाऱ्या जेएसडब्ल्यू समूहाचा ती एक भाग आहे. भारतातील हा आघाडीचा समूह स्टील, सिमेंट, ऊर्जा पायाभूत सुविधा, वाहननिर्मिती व पेंट्स या बी-टू-बी आणि बी-टू-सी क्षेत्रांत कार्यरत आहे. अॅक्झो नोबेल इंडिया ही सजावटीच्या आणि औद्योगिक स्वरुपाच्या पेंट्सचे उत्पादन करणारी कंपनी आहे. नेदरलँड्समध्ये मुख्यालय असलेल्या जागतिक स्तरावरील अॅक्झो नोबेल समूहाचा ती भाग आहे.
या अधिग्रहण प्रक्रियेमुळे ‘जेएसडब्ल्यू पेंट्स’ला भारतीय पेंट उद्योगातील एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान मिळणार आहे. आगामी काळात या कंपनीच्या उलाढालीत भरीव वाढ होण्याची अपेक्षा आहे.
‘जेएसडब्ल्यू पेंट्स’चे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल म्हणाले, "पेंट्स आणि कोटिंग्ज हे भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे आणि जेएसडब्ल्यू पेंट्स ही सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या पेंट कंपन्यांपैकी एक आहे. अॅक्झो नोबेल इंडिया ही ड्युलक्स, इंटरनॅशनल आणि सिकन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रसिद्ध पेंट ब्रँड्सचे माहेरघर आहे. या ब्रँड्सना जेएसडब्ल्यू कुटुंबात सामील करून घेताना आम्हाला आनंद होत आहे. अॅक्झो नोबेल इंडिया कुटुंबातील कर्मचारी, ग्राहक आणि भागीदार यांच्यासोबत मिळून आम्ही एक मोठी पेंट कंपनी घडवण्याचा संकल्प केला आहे. ‘ड्युलक्स’चा जादूई अनुभव आणि जेएसडब्ल्यू पेंट्सची विचारशीलता याच्या जोरावर आम्ही ग्राहकांना आनंद देण्याची आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्याची अपेक्षा ठेवतो."
‘अॅक्झो नोबेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पोक्स-गिलॉम म्हणाले, "हा व्यवहार आमच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अॅक्झो नोबेल इंडिया ही कंपनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करीत असते. कंपनीच्या यशोगाथेमध्ये सहभागी असलेले ब्रँड्स आणि कुशल कर्मचारी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. स्थानिक तज्ञता असलेल्या आणि या क्षेत्रात ठोस उद्दिष्ट ठेवणाऱ्या जेएसडब्ल्यूसोबतचा आमचा पुढील प्रवास दीर्घकाळ टिकून राहील, याबद्दल आम्ही निश्चिंत आहोत."
अधिग्रहणाच्या या व्यवहारासाठी जेएसडब्ल्यू पेंट्सचे वित्तीय सल्लागार म्हणून मॉर्गन स्टॅन्ली यांनी काम पाहिले. खेतान अॅण्ड कंपनीने कायदेशीर सल्ला दिला. डेलॉईट कंपनीने वित्तीय व कर साक्षांकन सल्लागार म्हणून भूमिका बजावली.
Comments
Post a Comment