बौद्ध कुटुंबावर जातीय अन्यायाचा आरोप; पोलिस आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष?
बौद्ध कुटुंबावर जातीय अन्यायाचा आरोप; पोलिस आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष?
मुंबई दि.२९/०४/२०२५ - सांताक्रूझ येथील किशोर कुमार गांगुली मार्ग, जुईनगर तारा रोड येथील एकता रहिवासी संघ परिसरात गेली ३० वर्षे राहणारे बौद्ध समाजाचे प्रतिनिधी सुहास धर्माजी कदम यांनी जातीय अत्याचार आणि सामाजिक बहिष्काराचे गंभीर आरोप आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केले .
कदम यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या परिसरात बौद्ध समाजाचे ते एकमेव कुटुंब असून, काही स्थानिक महिलांकडून त्यांच्यावर सातत्याने मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दबाव टाकण्यात येत आहे. त्यांनी ललिता भरीष्टे, हिरा झा, आणि कविता मोरे या महिलांवर आरोप केला की त्या त्यांच्या व्यसनाधीन मुलाला हाताशी धरून त्यांच्या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कदम यांचा दावा आहे की, या महिलांकडून त्यांना जातीय शिवीगाळ, धमक्या आणि मारहाणीचे प्रसंग वारंवार सहन करावे लागत आहेत. इतकेच नव्हे तर, आमदार निधीतून बसवलेली पाणीपुरवठा व्यवस्था त्यांच्या घरासाठी बंद करण्यात आली आहे. याशिवाय घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील धमकावले जाते.
तक्रारदाराने यासंदर्भात सांताक्रुज पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक राजकीय दबावामुळे पोलिस कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने मा. ना. श्री. रामदास आठवले, सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या कार्यालयातून सांताक्रुज पोलीस स्टेशनला न्याय मिळण्याबाबत पत्र दिलेले आहे.
“संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बौद्ध समाजावर जातीय अन्याय होत असल्याचे चित्र आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती सांताक्रुजमध्येही होत आहे,” असे कदम यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “या जातीवादी कारवायांवर ‘अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा’ (अॅट्रॉसिटी कायदा) अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे.”
Comments
Post a Comment