सांजाव चा उत्साह गोव्याला आनंदी परंपरेत एकत्र आणतो

सांजाव चा उत्साह गोव्याला आनंदी परंपरेत एकत्र आणतो 

जसजसे पावसाळी ढग गोव्याच्या आकाशात पसरतात, तसतसे गावोगाव आणि शहरांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पसरते. विहिरींमध्ये पावसाचं पाणी भरून वाहू लागतं, परिसर हिरवागार होतो आणि वातावरणात संगीत, हास्य आणि उत्साह भरून राहतो. सांजाव च आगमन गोव्याला श्रद्धा, आनंद आणि एकतेचा उत्सव बनवतो. दरवर्षी २४ जून रोजी साजरा केला जाणारा हा अनोखा पावसाळी सण गोव्यातील लोकांना एकत्र आणणारा एक रंगीबेरंगी उत्सव आहे.

हा सण सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या जन्माचा उत्सव आहे — जो संदेष्टा, ज्याने बायबलनुसार, येशूच्या आगमनाची बातमी मिळताच आपल्या आई एलिझाबेथच्या गर्भातच आनंदाने उडी घेतली होती. हीच उडी आज गोव्यातील लोक विहिरी, तलाव आणि ओढ्यांमध्ये आनंदाने मारतात — नवचैतन्य, कृतज्ञता आणि सामूहिक आनंदाचे प्रतीक म्हणून.

उत्तर ते दक्षिण, किनारपट्टीच्या गावांपासून ते आतल्या वाड्यांपर्यंत, सांजाव भरभरून आणि कल्पकतेने साजरा केला जातो. काही गावांनी तर या सणासाठी आपली खास परंपरा निर्माण केली आहे. उदा. सिओलीममध्ये, हा सण अतिशय भव्य पद्धतीने साजरा होतो. पावसाच्या पाण्याने भरलेल्या नद्या केलेच्या खोडांपासून बनवलेल्या तराफ्यांवर किंवा फुलांनी व पानांनी सजवलेल्या बोटींवर जल्लोष करणाऱ्या गाणाऱ्या-नाचणाऱ्या लोकांसाठी मंच बनतात. स्थानिक लोक कोपेल (फुलांचे मुकुट) घालून घुमोट आणि कांसाळेच्या तालावर नाचतात, तर मांडो आणि पारंपरिक गाणी आसमंतात घुमतात.

अशीच दृश्ये असगाव, अंजुना, कलंगुट, साळिगाव, कैंडोलीम आणि दक्षिण गोव्याच्या राया, बेनाउलिमसारख्या गावांमध्ये पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी नवविवाहित जावयांचे कोपेल घालून आनंदात स्वागत केले जाते आणि त्यांना विहिरीत उडी मारण्यापूर्वी गावभर मिरवले जाते. या मिरवणुका त्या घरांना भेट देतात जिथे नव्याने काही शुभ घडलेले असते — बाळंतपण, लग्न किंवा नवीन घर — तिथे ‘धाली’ गोळा केल्या जातात आणि आशीर्वाद दिले जातात. त्यानंतर सर्वजण गावाच्या विहिरीजवळ किंवा ओढ्याजवळ मोठ्या सामूहिक सोहळ्यासाठी एकत्र येतात.

घुमोटचा पारंपरिक ताल, लोकगीते, हंगामी फळे आणि स्थानिक फेणी यांचा सहभाग या सणांना एकत्रतेचा जल्लोष बनवतो. सांजाव ची खासियत म्हणजे श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरांचा सुंदर संगम. गोवेकर या काळात केवळ संताच्या जन्माबद्दलच नाही, तर निसर्गाच्या कृपेबद्दल, समुदायाच्या बळाबद्दल आणि परंपरांमधील आनंदाबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतात.

सांजाव ची ही भावना गोव्याच्या बाहेरही पोहोचते. लंडन, दुबई, मेलबर्न आणि कॅलिफोर्निया सारख्या शहरांमध्ये गोव्यातून गेलेली मंडळी कोपेल बनवून, पारंपरिक गाणी गाऊन, प्रतीकात्मक विहिरीत उड्या मारून, आणि हंगामी अन्न व पेय शेअर करून हा सण साजरा करतात. अनेकांसाठी ही परंपरा आपली ओळख पुन्हा जोडण्याचा मौल्यवान मार्ग बनते.

या सणाच्या केंद्रस्थानी आहे निसर्गाची कृपा, कुटुंब आणि एकोप्याबद्दल कृतज्ञता. झपाट्याने बदलणाऱ्या जगात, ही परंपरा आपली ओळख, मूळ आणि परंपरेशी आपला संबंध लक्षात आणून देते. गोवा या काळात आपल्या सगळ्यांसाठी बाह्या उघडतो — जीवन, प्रेम आणि एकतेचा आनंद साजरा करणाऱ्या या जिवंत परंपरेचा भाग व्हा. चला, सांजाव चा उत्साह अनुभवा आणि गोव्याच ते  रूप पहा जे  उन्हात नाही, तर पावसाळ्यात  खुलते .

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K