अवधूत गुप्तेंच्या 'आई' अल्बम मधील 'तू नसलीस तर' भावस्पर्शी गाणे प्रदर्शित
अवधूत गुप्तेंच्या 'आई' अल्बम मधील 'तू नसलीस तर' भावस्पर्शी गाणे प्रदर्शित
आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावतो आणि त्याच नात्याची गुंफण करणारे ‘तू नसशील तर’ हे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावभावनांनी भरलेल्या अल्बममधील हे तिसरे गाणे असून, त्यामधून आई आणि मुलाच्या नात्याची हळवी, खोल आणि मनाला भिडणारी भावना मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे गाणे पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यातील भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त होत आहेत. अवधूत गुप्ते यांनी हे गाणे स्वतः संगीतबद्ध केले असून त्याचे गायनही त्यांनीच केले आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या भावस्पर्शी गीताचे शब्द लिहिले आहेत समीर सामंत यांनी व संगीत संयोजनाची जबाबदारी अनुराग गोडबोले यांनी सांभाळली आहे.
'तू नसशील तर’ हे गाणे आईच्या अनुपस्थितीत निर्माण होणाऱ्या भावनिक पोकळीची हळवी जाणीव करून देणारे आहे. गाण्याचे बोल हृदयाला स्पर्श करणारे असून, अवधूत गुप्तेंचा आवाज या गाण्याला आणखी भावनात्मक उंचीवर घेऊन जातो. या गाण्याच्या निमित्ताने आईविषयीची कृतज्ञता, प्रेम आणि व्याकुळता अशा अनेक भावना व्यक्त होत आहेत.
या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “ ‘आई’ हा अल्बम माझ्या अत्यंत जवळचा आहेच मात्र ‘तू नसशील तर’ हे गाणे अधिकच जवळचे आहे. कारण, अलीकडेच मी माझ्या आईला गमावले असून त्या सर्व भावना या गाण्यातून मी व्यक्त केल्या आहेत. हे गाणे समुद्रकिनाऱ्यावर चित्रित करण्यात आले आहे याचं कारण म्हणजे मी जेव्हा समुद्रकिनारी जातो, आकाशाकडे बघतो तेव्हा मला असे वाटते की आई आहे आणि ती मला बघतेय. आई गेल्यानंतर माझ्या आयुष्यातील रंग उडाले होते. मला कशातच रस नव्हता. त्यामुळे ही अशी भावना असल्याने हे गाणे ब्लॅक अँड व्हाईट शूट करण्यात आले आहे.”
Comments
Post a Comment