सकाळ तर होऊ द्या' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला...

'सकाळ तर होऊ द्या' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला...

१० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार...

सुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा 'सकाळ तर होऊ द्या' हा चित्रपट फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. टीझरमध्ये झलक पाहिल्यानंतर या चित्रपटाची चर्चा अधिकाधिक रंगू लागली आहे. आता 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनी अंतर्गत ‘सकाळ तर होऊ द्या’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून समिट स्टुडिओज आणि मधु शर्मा हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. आजवर हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या दिग्दर्शक आलोक जैन यांनी या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री केली आहे. 

या चित्रपटातील सुबोध भावे आणि मानसी नाईक या दोन कलावंतांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुणावणार असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. आपल्या मनातील प्रश्नांची उकल करण्यासाठी संपूर्ण समाजापासून अलिप्त राहणाऱ्या नायकाची कथा या चित्रपटात असल्याचे ट्रेलरच्या सुरुवातीच्या संवादांवरून समजते. अशातच नायकाच्या आयुष्यात नियती नावाच्या नायिकेची एन्ट्री होते. इथूनच विचार आणि भाव-भावनांचा एक अनोखा प्रवास सुरू होतो. नायकाने त्याच्या मनात साठवून ठेवलेले जाणण्याचा प्रयत्न नायिका करते. नायक तिला एक काम करायला सांगतो जे ऐकून तिला धक्का बसतो. तो असे का सांगतो? याचे कोडे 'सकाळ तर होऊ द्या' हा चित्रपट पाहिल्यावर उलगडणार आहे. 'नाच मोरा...', आणि 'जगू दे मला...' या श्रवणीय गाण्यांचा समावेश करण्यात आल्याने ट्रेलर अधिकच लक्षवेधी बनला आहे. आजवर कधीही न दिसलेल्या लुकमधील सुबोधची व्यक्तिरेखा उत्सुकता वाढवणारी आहे. मानसीने साकारलेली नियती कुतूहल वाढविणारी आहे. 

'सकाळ तर होऊ द्या' चित्रपटाचे संवादलेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी केले असून छायांकन सुनील पटेल यांनी केले आहे. गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलेल्या गीतांना गायक-संगीतकार रोहित राऊत यांनी संगीत दिले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरक आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025