"नाट्य परिषद करंडक" अंतिम फेरी संपन्न...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
"नाट्य परिषद करंडक" अंतिम फेरी संपन्न...
'नाट्यशृंगार, पुणे' या संस्थेची 'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय' ही एकांकिका प्रथम !
मुंबई - रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव 'नाट्य परिषद करंडक' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये संपन्न झाली. दिनांक २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध १९ केंद्रांवर प्राथमिक फेरी घेण्यात आली. यातील निवडक २५ एकांकिकेची अंतिम फेरी दिनांक १५, १६, १७ व १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे संपन्न झाली.
नाट्य परिषदेने अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी त्यांच्या गावी जाऊन नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले. सदर कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून श्री. कुमार सोहोनी, श्री. संतोष पवार, श्री. राजीव तुलालवार, श्री. अद्वैत दादरकर, श्री. संतोष वेरुळकर, श्री. विजू माने, श्री. गणेश रेवडेकर, श्री. अमेय दक्षिणदास, श्री. प्रताप फड, श्री. मंगेश सातपुते, श्री. महेंद्र तेरेदेसाई, श्री. सचिन शिंदे, श्री. प्रदीप वैद्य श्री. विश्वास सोहोनी ह्या दिग्गज दिग्दर्शक व अभिनेत्यांनी मार्गदर्शन केले.
उत्साहपूर्ण वातावरणात, अनेक नाविन्यपूर्ण विषयांच्या एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या. अंतिम फेरीचे परिक्षक म्हणून श्री. विजय केंकरे, श्री. चंद्रकांत कुलकर्णी, श्रीमती सुहास जोशी, श्री. रविंद्र पाथरे, श्री. सौरभ पारखे यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे स्पर्धा समन्वयक म्हणून श्री. सतिश लोटके, डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी काम पाहिले.
सदर अंतिम फेरीसाठी श्री. सयाजी शिंदे, श्री. मकरंद अनासपुरे, श्री. विजय गोखले, श्री. संजय मोने, निर्माते दिलीप जाधव हे मान्यवर उपस्थित होते. या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन श्रीमती स्मिता गवाणकर ह्यांनी केले.
दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्री. अजित भुरे, कोषाध्यक्ष श्री. सतिश लोटके, नियामक मंडळ सदस्य श्री. विजय गोखले, श्री. सयाजी शिंदे, श्री. उदय राजेशिर्के, श्री. चंद्रशेखर पाटील, श्री. शिवाजी शिंदे, श्री. विजय सूर्यवंशी व परीक्षक ह्यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता नाट्य परिषदेचे विश्वस्त, ज्येष्ठ अभिनेते मा.श्री. मोहन जोशी, परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय गोखले, जेष्ठ अभिनेते श्री. संजय मोने, श्री. दिलीप जाधव इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले म्हणाले की, नाटकात काम करण्यासाठी चिकाटी, शिकण्याची जिद्द आणि व्यसनांपासून लांब राहता आलं पाहिजे. आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने जो काम करतो त्यावेळीच नाटक छान होतं, जो आपल्या स्वतः साठी करतो त्यावेळी तो एक खांबी तंबू होतो आणि नाटक चालत नाही. नाटकात काम करताना शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. बक्षीस मिळविणाराच हुशार असतो असं नाही तर चांगले काम करणाऱ्यालाच व्यावसायिक रंगभूमीवर काम मिळते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी केले तर आभार उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment