पंतप्रधान ४ जुलै रोजी राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर
पंतप्रधान ४ जुलै रोजी राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर
• पंतप्रधान बालोतरा येथे सुमारे ₹१.०६ लाख कोटींच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन करतील.
• पेट्रोकेमिकल, शहरी परिवहन, रेल्वे, रस्ते, नवीकरणीय ऊर्जा आणि वीज प्रसारण यांसह अनेक क्षेत्रांतील प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल.
• पंतप्रधान बालोतरा येथील पचपदरा येथे भारतातील पहिला ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल संकुल राष्ट्राला समर्पित करतील.
• अत्याधुनिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल संकुलाची उभारणी ₹७९,४५० कोटींहून अधिक गुंतवणुकीतून करण्यात आली आहे.
• पंतप्रधान जयपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करतील.
• पंतप्रधान जोधपूर येथे सुधारित उडान (UDAN) योजनेचा शुभारंभ करतील.
• पंतप्रधान जोधपूर विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील.
• भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पंतप्रधान अहमदाबादमधील साणंद येथे सीजी सेमी (CG Semi)च्या ओएसएटी (OSAT) सुविधेचे उद्घाटन करतील.
• सीजी सेमी प्रकल्प हा भारतातील सुरुवातीच्या एंड-टू-एंड ओएसएटी सुविधांपैकी एक असून, तो सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग सेवा प्रदान करेल.
• पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर हा प्रकल्प दरवर्षी ५ अब्जांपर्यंत सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन करण्यास सक्षम असेल.
मुंबई, ३ जुलै २०२६: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ४ जुलै २०२६ रोजी राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सुमारे १०:४५ वाजता ते जोधपूर विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील तसेच सुधारित उडान (UDAN) योजनेचा शुभारंभ करतील. त्यानंतर सुमारे १२:१५ वाजता ते बालोतरा येथे पोहोचतील, जिथे ते सुमारे ₹१.०६ लाख कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. यावेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.
यानंतर पंतप्रधान गुजरातकडे रवाना होतील. सायंकाळी सुमारे ४:३० वाजता ते अहमदाबादमधील साणंद येथे सीजी सेमीच्या आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (OSAT) सुविधेचे उद्घाटन करतील आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील.
प्रादेशिक हवाई संपर्काला नवी गती देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान जोधपूर येथे सुधारित उडान (UDAN) योजनेचा शुभारंभ करतील. ही योजना भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, "उडे देश का आम नागरिक" या संकल्पनेला पुढे नेणारी असेल.
पुढील १० वर्षांसाठी ₹२८,८४० कोटींच्या तरतुदीसह ही योजना विमानवाहतूक-आधारित विकासाच्या पुढील टप्प्याला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवते. या अंतर्गत देशभरात १०० नवीन एअरोड्रोम विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी ₹१२,००० कोटींपेक्षा अधिकची तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक विमानतळांच्या संचालन आणि देखभालीसाठी (O&M) ₹२,५०० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल. दुर्गम भागांमध्ये अधिक चांगली हवाई संपर्क व्यवस्था निर्माण करण्यासाठी २०० आधुनिक हेलिपॅडही विकसित करण्यात येतील.
पंतप्रधान जोधपूर विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारतीचेही उद्घाटन करतील. ₹४८० कोटींच्या खर्चातून उभारण्यात आलेली ही इमारत २३,००० चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळात पसरलेली असून, दरवर्षी २० लाख प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता तिच्यात आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या टर्मिनलमध्ये राजस्थानच्या पारंपरिक स्थापत्यशैलीचा आणि आधुनिक डिझाइनचा सुंदर संगम पाहायला मिळतो. ऊर्जा कार्यक्षमता, जलसंधारण आणि हरित बांधकामाच्या निकषांचा अवलंब करून ही इमारत ५-स्टार GRIHA रेटिंग मिळवण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे. या नव्या टर्मिनलमुळे परिसरातील पर्यटन, व्यापार आणि रोजगाराला नवी चालना मिळेल.
पंतप्रधान बालोतरा येथे सुमारे ₹१.०६ लाख कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. हे प्रकल्प पेट्रोकेमिकल, शहरी परिवहन, रेल्वे, रस्ते, नवीकरणीय ऊर्जा आणि वीज प्रसारण यांसह अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत.
पंतप्रधान पचपदरा येथील भारतातील पहिल्या ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल संकुलाचे राष्ट्राला समर्पण करतील. देशाच्या ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रातील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
एचपीसीएल आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त उपक्रमातून विकसित करण्यात आलेल्या ९ एमएमटीपीए (MMTPA) क्षमतेच्या या प्रकल्पासाठी ₹७९,४५० कोटींहून अधिकची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा अत्याधुनिक संकुल रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल उत्पादन यांचे एकात्मीकरण करणारा असून, त्याची पेट्रोकेमिकल उत्पादन क्षमता २.४ एमएमटीपीए आहे. या संकुलाचा नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स १७.० असून, पेट्रोकेमिकल उत्पन्न (यिल्ड) २६ टक्क्यांहून अधिक आहे, जे जागतिक मानकांनुसार आहे.
हा प्रकल्प भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट करण्यास, पेट्रोकेमिकल क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढविण्यास आणि औद्योगिक विकासाला गती देण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच हा प्रकल्प या प्रदेशात प्रस्तावित पेट्रोकेमिकल आणि प्लास्टिक पार्कच्या विकासाचा पाया ठरेल आणि डाउनस्ट्रीम उद्योगांना चालना देईल. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करून या प्रदेशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासालाही गती मिळेल.
पंतप्रधान ₹१३,००० कोटींहून अधिक खर्चाच्या जयपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या (दुसरा टप्पा) भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पाडतील. या प्रकल्पांतर्गत ४१ किलोमीटर लांबीचा उत्तर-दक्षिण मेट्रो कॉरिडॉर विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये ३६ स्थानकांचा समावेश असेल.
Comments
Post a Comment