स्वित्झर्लंडच्या सुरसे गावाला लाभला मराठी राजा
स्वित्झर्लंडच्या सुरसे गावाला लाभला मराठी राजा
~‘आरपार’ मुलाखतीने उलगडला आशिष आरोंदेकर या मराठमोळ्या ‘राजा’ चा प्रवास~
पुणे दि.०९ मे २०२२,(BDN): एक मराठी मुलगा वयाच्या जेमतेम पंचविशीत स्वित्झर्लंडला जातो. तिथे स्थायिक होतो. तिथल्या मातीत एवढा रुजतो की एक दिवस तिथल्या गावाचा राजा होतो. परिकथाच वाटावी अशी असली तरी ही परिकथा नाही तर सत्यकथा आहे. आशिष आरोंदेकर असं या मूळ मुंबईकराचं नाव आहे. स्वित्झर्लंडमधील सुरसे या गावाचा १३६ वा राजा होण्याचा मान नुकताच आरोंदेकर यांना बहाल करण्यात आला आहे.
सोशल मिडियावर माहिती आणि मनोरंजनाला एक नवा आणि सशक्त पर्याय देण्यासाठी सुरु झालेल्या ‘आरपार’ या युट्यूब चॅनलवर आशिष आरोंदेकर यांनी आपला प्रवास उलगडला आहे. अभिनेते, लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी आपल्या ‘छंदोबा’ या आरपारवरील कार्यक्रमात आरोंदेकर यांचा मुंबई ते स्वित्झर्लंड ते सुरसेचा राजा हाप्रवास जाणुन घेतला आहे.आशिष आरोंदेकर हे सध्या एचसीएल या आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहेत. १९९० मध्ये ते स्वित्झर्लंड येथे जाऊन स्थायिक झाले. नुकत्याच तेथिल सुरसे या गावाच्या झुंप्ट अर्थात स्थानिक संघटनेने त्यांची राजा म्हणुन निवड केली आहे. १८७६ पासून ही झुंप्ट कार्यरत आहे. तिच्या सदस्यांपैकी एक जण दरवर्षी राजा म्हणुन निवडला जातो. आशिष आरोंदेकर हे या गावाचे १३६ वे राजे ठरले आहेत. विशेष म्हणजे या गावाचा राजा होण्याचा बहुमान मिळवणारे ते पहिले युरोपीयन नसलेले किंवा गौरेतर नागरिक आहेत.
आरोंदेकर सांगतात,तेथिल समाज हा अत्यंत रुढीप्रिय तरी नव्या गोष्टींचा स्विकार करणारा आहे.तेथे स्थायिक झाल्यानंतर मी स्विस जर्मन ही मातृभाषा शिकलो.त्यामुळे तेथिल माणसे, संस्कृती यांच्याशी माझे नाते तयार झाले.कालांतराने मी झुंप्ट या संस्थेचा सदस्य झालो.या झुंप्टमार्फत दरवर्षी एका सदस्य व्यक्तीची राजा म्हणुन निवड होते.राजेशाही परंपरेचे जतन करणे, तिचा नव्या पिढीला परिचय करुन देणे हा यामागील उद्देश आहे.राजा केवळ नामधारी नसुन त्याला खरोखरीच खुप मान आहे. गावात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पाच दिवसांच्या कार्निवलचा राजा हा प्रमुख असतो.त्या काळात महापौर शहराचा कारभार प्रतिकात्मक किल्ली देऊन राजाकडे सोपवतात.केवळ मानमरातब एवढेच नव्हे तर सामाजिक कार्य आणि जबाबदाऱ्याही राजाने पार पाडणे आवश्यक असते. त्याने आपल्या कार्यकाळात आपल्या पदाला साजेसे वर्तन करणे अपेक्षित असते.एक वर्षाच्या कारकिर्दीनंतर नवा राजा निवडला जातो. त्यावेळी पायऊतार राजा नव्या राजाचा बॅाडीगार्ड म्हणुन काम करतो.यात कोणताही दिखावा नसुन प्रेम आणि आदराने सगळ्या गोष्टी केल्या जातात.असेही आरोंदेकर स्पष्ट करतात.परक्या देशात जाऊन स्थायिक झाल्यानंतर स्थानिक लोकांनी आपल्याला आपलेसे करणे आणि अशा एखाद्या ऐतिहासिक परंपरेसाठी आपली निवड करणे हे अक्षरशः स्वप्नवत आणि भारावुन टाकणारे आहे अशी भावनाही आशिष आरोंदेकर व्यक्त करतात.
Comments
Post a Comment