झी मराठीवर १२ जूनपासून सत्यवान-सावित्री ही मालिका..
गोष्ट सत्यवान-सावित्रीची, प्रेमावरील विश्वासाची!!
आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची गोष्ट लवकरच प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. सत्यवानावरील असिम प्रेमामुळे यमदेवांशी कुशलतेने संवाद साधण्याचं धैर्य सावित्रीच्या ठायी आलं. तिच्यातील कलागुणांनी तिला सामान्यातून असामान्य घडवलं. तिची ही प्रेरणादायी गोष्ट तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने झी मराठी वाहिनीने ही कथा दैनंदिन मालिकेतून सादर करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. नेहमीच प्रयोगशील आणि वेगळ्या विचार करणाऱ्या झी मराठी वाहिनीची ही कलाकृती प्रेक्षकांना नक्की आवडेल.
महाभारताच्या वनपर्वातील एक उपकथानक म्हणून आलेली सत्यवान-सावित्रीची गोष्ट सर्वांनाच माहित आहे. परंतु ही सावित्री कोण होती, कशी होती, तिची आणि सत्यवानाची भेट कशी झाली, तिच्याकडे असं कोणतं सामर्थ्य होतं की ज्यामुळे तिने सत्यवानाचे प्राण परत आणले. याचं आजवर प्रत्येकालाच कुतूहल आहे. अश्वपती राजाची लाडकी कन्या ते सत्यवानाशी लग्न झाल्यावर सासरच्या कुळाचा सन्मान वाढवणारी आदर्श सून हा प्रवास सावित्रीसाठी अतिशय खडतर होता. यासाठी तिला असंख्य संकटांचा सामना करावा लागला.
झी मराठी वाहिनीवर भव्य-दिव्यपणे सादर होणारी ही मालिका प्रेक्षकांना सत्यवान-सावित्रीच्या मनोहारी विश्वात घेऊन जाणार आहे. सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची आणि निष्ठेची ही कथा आहे. या मालिकेचं दृश्यरुप प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करणारं असणार आहे. असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी निर्धार आणि योग्य निर्णय घ्यावा लागतो. तसेच जीवघेण्या संकटावर मात करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असावी लागते, हे आपल्याला सत्यवान-सावित्रीच्या गोष्टीतून अनुभवता येणार आहे. या मालिकेची निर्मिती द फिल्म क्लिक यांनी केली असून आदित्य दुर्वे आणि वेदांगी कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकतंच प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिला आणि प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. सत्यवान-सावित्रीचं असीम प्रेम आणि सावित्रीचा सामान्यातून असामान्य प्रवास कसा होता, हे पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी सत्यवान-सावित्री ही मालिका झी मराठीवर १२ जूनपासून संध्याकाळी ७ वाजता येत आहे.
Comments
Post a Comment