'शेर शिवराज'चा जगभर डंका
भारतात १०००, तर परदेशात १०० शोज हाऊसफुल
लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज' रूपी चौथे सिनेपुष्प रसिक दरबारी सादर केले आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळाले. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही 'शेर शिवराज'चा डंका वाजत असून लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत, साहसदृश्ये या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. पहिल्या दोन आठवडयांच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या आठवड्यातही 'शेर शिवराज'ची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहणार आहे.
'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड'नंतर 'शेर शिवराज'च्या रूपात 'शिवराज अष्टक' या संकल्पनेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. 'शेर शिवराज' चित्रपटानं यापूर्वीच्या तीनही चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने जोरदार कूच केल्याचं चित्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पहायला मिळत आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात या चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, तर परदेशात हा आकडा १०० शोजवर पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, 'शेर शिवराज'च्या टिमने घेतलेल्या मेहनतीवर रसिकांनी कौतुकाची थाप मारल्याचं सांगणारे हे आकडे आहेत. टिकिटींग पोर्टलवर या चित्रपटाला ९७% रेटींग मिळालं आहे. परदेशांमध्ये सध्या १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये 'शेर शिवराज' पाहिला जात आहे. यात युएसएमधील २०, जर्मनीतील १०, दुबईमधील १०, युकेमधील ५, कॅनडातील ५, ऑस्ट्रेलियातील ४ शहरांचा समावेश आहे. याखेरीज फिनलॅन्डमध्ये ३, युएई, बहारीन, ओमानमध्ये ५ शोज सुरू आहेत. हा आकडा आजवरच्या मराठी चित्रपटांच्या इतिहासातील खूप मोठा आहे. परदेशांमध्ये मराठी चित्रपटाला मिळत असलेलं हे यश खूप मोठं आणि मराठी सिनेसृष्टीच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कॅलिफोर्नियास्थित फाइव्ह डायमेंशन एंटरटेनमेंटच्या सहकार्याने मुंबई मूव्ही स्टुडिओजने हे आंतरराष्ट्रीय वितरण केले आहे. मुंबई मुवी स्डुडिओजच्या साथीने जीसीसी देशातील वितरणाची जबाबदारी दीपा भारथ यांनी सांभाळली.
तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करणाऱ्या 'शेर शिवराज' चित्रपटाचे प्रेक्षक मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहेत. 'शेर शिवराज' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे प्रत्येक सेंटरमध्ये शोजची संख्या वाढवावी लागली. तरीही प्रेक्षकांना तिकीट्स अपुऱ्या पडल्याचे चित्रपट अनेक ठिकाणी पहायला मिळाले. चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. 'शिवबा राजं...' या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन डान्स करत आहेत. डोक्यावर फेटे, पगडी, हातात भगवे झेंडे आणि मुखानं 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करत प्रेक्षकांचे लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत. हे दृश्य केवळ भारतातच नव्हे, परदेशातही पहायला मिळत आहे. परदेशामध्ये शिवजयंतीच्या मुहूर्तावर 'शेर शिवराज'च्या गाण्यांचा बोलबाला होता. 'शेर शिवराज'च्या रूपात 'शिवराज अष्टक' या संकल्पनेच्या मुकूटात आणखी एक माणिकरत्न जडलं गेलं आहे. 'शेर शिवराज' चित्रपटाची प्रस्तुती आणि निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, नवीन चंद्रा यांनी राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांच्या साथीने केली आहे.
'शिवराज अष्टक' मध्यावर पोहोचलं असताना 'शेर शिवराज'नं एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, पुढील चित्रपटात दिल्लीचे तख्त राखण्यासाठी त्या दिशेनं कूच करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील चित्रपटाबाबतही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आहे.
Comments
Post a Comment