पिकल म्युझिकचं नवं गाणं 'मन धुंद झाले'
पिकल म्युझिकचं नवं गाणं 'मन धुंद झाले'
आजच्या सिंगल्सच्या युगात नवनवीन गाणी संगीतप्रेमींना मोहिनी घालत आहेत. नव्या दमाचे गीतकार-संगीतकार उदयोन्मुख कलाकारांच्या साथीनं वेगवेगळ्या धाटणीची गाणी घेऊन येत आहेत. अशा गाण्यांना रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम काही आघाडीच्या संगीत कंपन्या अविरतपणे करत आहेत. या कामात नेहमीच आघाडीवर असलेल्या पिकल म्युझिकनं आजवर बरीच लोकप्रिय गाणी संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू केली आहेत. हिच परंपरा जपत पिकल म्युझिकनं एक नवं कोरं गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे. 'मन धुंद झाले...' असे बोल असलेल्या या गाण्यानं लाँच झाल्यानंतर लगेच संगीतप्रेमींना खऱ्या अर्थानं धुंद केलं आहे. सोशल मीडियावर हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरत आहे.
समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकची प्रस्तुती असलेल्या 'मन धुंद झाले' या गाण्याची निर्मिती एसडी प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही अशी काहीशी प्रेमाची नवी व्याख्या सांगत हे गाणं रसिकांना बेधुंद करत आहे. निलेश जगधने आणि राधिका पाटील या कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. निसर्गरम्य ठिकाणांवर चित्रीत करण्यात आलेलं हे कर्णमधूर गाणं नेत्रसुखदही आहे. या गाण्यात राधिकानं सुरेख डान्स केला असून, निलेशनं तिला छान साथ दिली आहे. प्रेमाचा गुलाबी रंग उधळणाऱ्या या गाण्यात निलेश-राधिकाची केमिस्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे. 'मन धुंद झाले' या गाण्याचं दिग्दर्शन प्रशांत निघोजकर यांनी केलं आहे. गीतकार भरत यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत संगीतकार संदीप योगेश यांनी केतकी माटेगावकर आणि संदीप यांच्या आवाजात स्वरबद्ध केलं आहे. अमोल वाघमारे यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. 'मन धुंद झाले' हे गाणं प्रेमाचे अंतरंग उलगडणारं असून, यातील शब्दरचना प्रेमाची नवी व्याख्या सांगणारी असल्याचं मत दिग्दर्शक प्रशांत निघोजकर यांनी केलं आहे. केतकी माटेगावकर आणि संदीप यांच्या गायनाने 'मन धुंद झाले' या गाण्याला सुरेल न्याय देण्याचं काम केल्याची भावना समीर दीक्षित यांनी व्यक्त केली.
डिओपी नवनाथ यांनी या गाण्याची सिनेमॅटोग्राफी केली असून, सुजीत जाधव यांनी द्रोण हाताळण्याचं काम केलं आहे. संकलन आणि डीआय विनोद राजे यांनी केलं असून शरद नवगिरे प्रोडक्शन मॅनेजर आहेत. भारती डी. जगधने आणि रुपाली जरद यांनी कॅास्च्युम केले असून, मेकअप आणि हेअर ड्रेसिंग विजया क्षीरसागर यांनी केले आहे. या गाण्याची स्टील फोटोग्राफी किशोर लहुरे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment