मागील मिनी आँलिंपिक क्रिडा स्पर्धेतून आँलिंपिक विजेते घडावेत - पवार
मागील मिनी आँलिंपिक क्रिडा स्पर्धेतून आँलिंपिक विजेते घडावेत - पवार
पुणे- महाराष्ट्रात बऱ्याच वर्षांनी मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा यंदा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमधून भावी ऑलिंपिक पदक विजेते घडावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अजितदादा पवार यांनी संघटनेच्या बैठकीत व्यक्त केली.
महाराष्ट्रात यंदा राज्यस्तरावर विविध खेळांची मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धा संदर्भात संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस असोसिएशनचे महासचिव श्री. नामदेव शिरगावकर आणि राज्याचे नवनियुक्त क्रीडा आयुक्त श्री. सुहास दिवसे यांनीही मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी देशाला ऑलिंपिकमधील पहिले पदक मिळवून दिले. त्यांचा वारसदार घडवण्याची जबाबदारी राज्यातील सर्व क्रीडा संघटनांची आहे. प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेने क्रीडा प्रशिक्षण आणि व्यवस्थापन यावर बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हरियाणा, पंजाब, ओडिशा इत्यादी राज्यांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचा नावलौकिक उंचावला आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आपल्या राज्यातील क्रीडा संघटने खेळाडूंच्या विकासावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य मिळेल याची मी ग्वाही देतो. मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत नैपुण्यशोध आणि विकास यावर भर दिला पाहिजे असेही श्री पवार यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, तालुका आणि क्रीडा स्तरावरील असलेल्या विविध क्रीडा संकुलांचा खेळाडूंना अधिकाधिक कसा फायदा होईल या दृष्टीने प्रत्येक खेळाच्या संघटनेने जबाबदारी उचलली पाहिजे.
असोसिएशनचे महासचिव श्री. नामदेव शिरगावकर सांगितले, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनने आगामी आठ वर्षांच्या विविध क्रीडाविषयक योजनांचे नियोजन केले आहे. इसवी सन २०२८ व २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकावीत या दृष्टीनेच आम्ही नैपुण्यशोध व विकास या अनुषंगाने काही योजना आखल्या आहेत. आगामी मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही त्या दृष्टीनेच पायाभरणी असणार आहे. या स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यांमधून नऊ हजार खेळाडू व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेला भावी ऑलिंपिकपटूंचा शोध घेणे सोपे होणार आहे. ही स्पर्धा दिमाखदार आणि संस्मरणीय व्हावी या दृष्टीनेच आमचे प्रयत्न राहतील. या स्पर्धेनिमित्त क्रीडा ज्योतीचे आयोजन केले जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात या ज्योतीचा प्रवास असेल. त्यामुळे राज्यात क्रीडाविषयक सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
राज्याचे नवनियुक्त क्रीडा आयुक्त श्री. सुहास दिवसे यांनी सांगितले, खेळाडू हाच केंद्रबिंदू मानून राज्याचे क्रीडा संचालनालय काम करीत राहणार आहे. आगामी तीन वर्षांच्या क्रीडा स्पर्धा आणि त्या अनुषंगाने आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम याचा आराखडा आम्ही लवकरच निश्चित करणार आहोत. प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेकडून प्रत्येक खेळाडू व प्रशिक्षक यांची सविस्तर माहिती आम्ही संकलित करणार आहोत. त्यामुळे खेळाडूची पार्श्वभूमी, त्याला आलेल्या अडीअडचणी इत्यादींचा अभ्यास आम्हाला करणे सोपे पडणार आहे. त्याचा फायदा त्याला विविध सुविधा देण्यासाठी निश्चितच होणार आहे. शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिल्यामुळे आता लवकरच या स्पर्धेचे कार्यक्रम पत्रिकाही निश्चित केली जाईल.
या बैठकीस महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे संलग्न क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. असोसिएशनचे खजिनदार श्री. धनंजय भोसले यांनी आभार मानले.
यावेळी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री बाळासाहेब लांडगे. उपाध्यक्ष श्री. संजय शेटे, श्री. निलेश जगताप, श्री. राजाराम राऊत, सहसचिव श्री. प्रकाश तुळपुळे व श्री. सुंदर अय्यर, तसेच अमित गायकवाड श्री. पूर्णपात्रे, श्री. सोपान कटके, सौ. स्मिता यादव इत्यादी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment