गोल्डन बोनस कामगिरीसाठी कबड्डी संघाचा कसून सराव
पुण्यातील बालेवाडी येथे सराव व प्रशिक्षणाला सुरुवात
विशेष प्रतिनिधी पुणे
सर्वोत्तम चढाई आणि अचूक पकडीच्या बळावर पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गोल्डन बोनस कामगिरी करण्यासाठी महाराष्ट्राचा युवा कबड्डी संघ सज्ज झाला आहे. किताबाचा बहुमान महाराष्ट्राला मिळवून देण्याच्या इराद्याने युवा खेळाडू पुण्यातील बालेवाडी मध्ये कसून सराव करत आहेत. प्रशिक्षक गीता साखरे, दादासाहेब आव्हाड व केतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचे संघ तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशचे मैदान मारून सोनेरी यश संपादन करण्याचा दावा संघाने केला आहे.
खेलो इंडिया युथ गेम्स च्या तयारीसाठी शनिवारी सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक नवनाथ फडतरे, तसेच विशेष कार्यकारी अधिकारी आनंद वेंकटेश्वर यांच्या उपस्थितीमध्ये प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे. यादरम्यान मान्यवरांनी शिबिरात सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच किताबाचा बहुमान मिळवून देण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यादरम्यान एनआयएस प्रशिक्षक दादासाहेब आव्हाड व केतन गायकवाड तसेच फिजिओथेरपीस्ट व योगा आंतरराष्ट्रीय खेळाडू वंदना कोरडे उपस्थित होते.
मॅटवर सराव; मजबूत डावपेच
महाराष्ट्राची महिला आणि पुरुष कबड्डी संघ सध्या पुण्यातील बालेवाडी मध्ये आगामी खेलो इंडिया युथ गेम्स ची तयारी करत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवर या सर्व शिबिराचे आयोजन करण्यात आले. तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही संघ सध्या सर्वोत्कृष्ट डावपेच आणि सर्वोत्तम खेळीवर भर देत आहेत. त्यामुळे संघाचा किताब जिंकण्याचा दावा अधिक मजबूत होत आहे.
बोनस साठी खास शैली
ग्रामीण भागातून नैसर्गिक शरीर संपदा आणि प्रचंड ताकदने परिपूर्ण असलेले युवा खेळाडू सध्या संघामध्ये सहभागी आहेत. या खेळाडूंना मैदानावर खेळताना सर्वोत्तम चढाई करणे, अचूक पकडी करणे आणि बोनस मिळवण्याच्या खास शैली शिकवल्या जात आहेत. या तंत्रशुद्ध प्रशिक्षणामुळे खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावत आहे. तसेच त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचेही युवा खेळाडू निश्चितपणे किताबाचा बहुमान मिळवतील, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला.
दडपण दूर करण्याची खास तंत्र
मैदानावर खेळताना होत असलेल्या चुकांमुळे खेळाडू प्रचंड दबाव देतो आणि त्यामुळे त्याच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होतो, हेच धोके टाळण्यासाठी खास फीजिओथेरपिस्ट व योगा तज्ञ वंदना कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू दडपण दूर करण्याचे तंत्र शिकत आहेत. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आत्मविश्वास बळावत असल्याचे खेळाडूंनी सांगितले.
Comments
Post a Comment