महाराष्ट्र संघाचे पथक प्रमुख श्री. चंद्रकांत कांबळे
"सर्वसाधारण विजेतेपदासाठी आमचे खेळाडू उत्सुक": चंद्रकांत कांबळे
भोपाळ (खास प्रतिनिधी): आमच्या खेळाडूंना सरावाच्या वेळी अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि सर्वोत्तम मार्गदर्शन मिळाले असल्यामुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया गेम्स मध्ये महाराष्ट्राचा संघ सर्वसाधारण विजेतेपद मिळविणारच असा आत्मविश्वास महाराष्ट्र संघाचे पथक प्रमुख श्री. चंद्रकांत कांबळे यांनी येथे व्यक्त केला.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या काही खेळाडूंचे येथे आगमन झाले असून हे खेळाडू येथील विविध क्रीडा संकुलांमध्ये सरावही करू लागले आहेत. स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना आणि संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी येथील संयोजकांनी अतिशय चांगली व्यवस्था केली आहे.
महाराष्ट्र संघाच्या तयारीविषयी श्री. कांबळे पुढे म्हणाले," गतवर्षी पंचकुला येथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया गेम्स मध्ये आम्ही शेवटपर्यंत यजमान हरियाणाच्या खेळाडूंना चांगली लढत दिली होती. यंदा हरियाणा व यजमान मध्य प्रदेश यांच्यापेक्षा आमच्या पथकात कमी खेळाडू असले तरीही आमचे खेळाडू या दोन्ही राज्यांच्या खेळाडूंपेक्षा अधिक उज्वल कामगिरी करतील आणि सर्वाधिक सुवर्णपदकांसह सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरतील. आमचे खेळाडू भलेही संख्येने कमी असले तरी दर्जाबाबत ते कुठेही कमी नाहीत अशी मला खात्री आहे."
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत असलेल्या २७ क्रीडा प्रकारांपैकी २२ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राचे पावणे चारशे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्या मदतीसाठी सव्वाशेहून अधिक सपोर्ट स्टाफचा सहभाग असणार आहे. खो खो व कबड्डी इत्यादी सांघिक खेळांमध्ये आम्हाला विजेतेपदाची खात्री आहे. या संघांनी खूप चांगली तयारी केली आहे या खेळाडूंना नियमित मार्गदर्शकांबरोबरच अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंचेही विशेष मार्गदर्शन लाभले आहे. त्यांना मेंटल ट्रेनर, फिजिओ, व्हिडिओ ॲनेलिसिस, मेडिटेशन इत्यादी बाबतही अनुभवी तज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे."
महाराष्ट्र पथकाबरोबर नोडल अधिकारी म्हणून श्री. अनिल चोरमले तर व्यवस्थापक म्हणून श्री. अरुण पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनीही महाराष्ट्राच्या कामगिरीविषयी आत्मविश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंना सराव शिबिरात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी आम्ही घेतली असल्यामुळे आणि खेळाडूंनीही मनापासून एकाग्रतेने सराव केला आहे. हे लक्षात घेतले तर महाराष्ट्राचे खेळाडू या स्पर्धेत वर्चस्व गाजवतील अशी आम्हाला खात्री आहे.
Comments
Post a Comment