'चल हल्ला बोल' चित्रपटाची निर्मिती म्हणजे मल्लिका नामदेव ढसाळ यांच्यावर अन्याय...

'चल हल्ला बोल'चित्रपटाची निर्मिती म्हणजे मल्लिका नामदेव ढसाळ यांच्यावर अन्याय - संजय पांडे

पद्यश्री नामदेव ढसाळ यांची प्रतिमा मलीन करणाऱ्याला कायद्याने उत्तर देणार -मल्लिका नामदेव ढसाळ 

चित्रपटाच्या हक्कांसाठी मल्लिका नामदेव ढसाळ यांना विचारणा नाही

महेश बनसोडे दिग्दर्शित 'चल हल्ला बोल' चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बायोस्कोप फिल्म्स, दिग्दर्शिका वरुणा राणा यांचा पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची मागील दोन -तीन वर्षांपासून चर्चा असतानाही 'चल हल्ला बोल'चे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी चित्रपटाची निर्मिती करताना नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका नामदेव ढसाळ यांच्याकडून कोणतीही परवानगी, हक्क न घेता चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा सर्वत्र गाजावाजा होत असतानाच पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका नामदेव ढसाळ यांनी या चित्रपटाच्या निर्मितीबाबत आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी मुंबईत नुकतीच एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका नामदेव ढसाळ, बायोस्कोप फिल्म्सचे निर्माते संजय पांडे आणि लेखिका, दिग्दर्शिका वरुणा राणा उपस्थित होत्या. 

बायोस्कोप फिल्म्सचे निर्माते संजय पांडे म्हणतात, '' पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आम्ही बनवत असून गेली दोन वर्षं आम्ही मीडियामध्ये बातम्या देत आहोत. त्याची कात्रणेही मी दाखवली आहेत. तरीही दिग्दर्शक बनसोडे यांनी चित्रपट बनवताना  ना आम्हाला, ना मल्लिकाजींना संपर्क केला. ना त्यांची परवानगी घेतली. आमचे स्पष्ट म्हणणे आहे, हे मल्लिकाजींच्या अधिकारांचे हनन आहे. त्यांच्यावर हा अन्याय आहे आणि या अन्यायाविरोधात आम्ही सगळे जण त्यांच्या पाठीशी उभे राहाणार आहोत.''

मल्लिका नामदेव ढसाळ या प्रकरणाबाबत म्हणाल्या, '' इतकी भयंकर वेळ माझ्यावर येईल, याचा विचारही केला नव्हता.  ज्याने 'चल हल्ला बोल' चित्रपट केला आहे त्या माणसाने कोणत्याची प्रकारे माझ्याशी संपर्क साधलेला नाही, ना माझी परवानगी घेतली. असे असताना ते जगात सगळीकडे हा चित्रपट दाखवत आहेत. गाजावाजा करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. मी सांगू इच्छिते, कॉपीराईट ॲक्टनुसार पन्नास वर्षांआधी एखाद्या लेखकाचे किंवा व्यक्तीचे साहित्य ही साहित्यिकाची बौद्धिक मालमत्ता असते. ती वापरण्याचा आणि त्याचा गैरफायदा घेण्याचा अधिकार नसतो. मी आज सांगू इच्छिते, जे लोक अशी दुकानं मांडतील आणि नामदेव ढसाळ यांचे नाव किंवा त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील , त्यांना मी कायद्याच्या भाषेतच उत्तर देईन.'' 

दिग्दर्शिका वरुणा राणा म्हणाल्या, '' दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी हा सिनेमा बनवत असताना बायोस्कोप फिल्म्स आणि मल्लिकाजींकडून कोणतेही हक्क घेतलेले नाहीत. आम्ही हा चित्रपट बनवताना मल्लिकाजींकडून कायदेशीररित्या सगळे हक्क घेतले आहेत. गेली तीन वर्षं आम्ही याचा अभ्यास करत आहोत, आणि प्रत्येक गोष्ट आम्ही मल्लिकाजींना दाखवून, त्यांच्याशी याबाबत चर्चा करून मगच पुढे जात आहोत. मुळात हा खूप खोल आणि संवेदनशील विषय आहे. त्यामुळे कोणीही उठून असा चित्रपट करू शकत नाही.''

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..