१०० व्या नाट्यसंमेलनातील नाट्य महोत्सवाचा सांगता समारोह संपन्न
मराठी नाट्यसृष्टीच्या उगमावर विशेषज्ञांनी प्रबंध करावा, त्यासाठी राज्यसरकार मदतशील - ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
१०० व्या नाट्यसंमेलनातील नाट्य महोत्सवाचा सांगता समारोह संपन्न
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी मा.ना.अॅड आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. विकास खारगे (मा. मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग) उपस्थित होते. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा बहुभाषिक नाटकांचा आस्वाद नाट्यरसिकांना या विशेष नाट्य महोत्सवात घेता आला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मा. अजित भुरे (प्रमुख कार्यवाह) यांच्या हस्ते आशिषजी शेलारसाहेब आणि विकास खारगे यांचा मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना, मा. खारगे साहेब म्हणाले, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने १०० व्या नाट्य संमेलनाद्वारे आयोजित केलेला हा नाट्यजागर खरोखरीच खूप स्तुत्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाटकं पोहोचवण्यासाठी एक/दोन दिवस नाही तर तब्बल वर्षभर राज्यभरात आयोजित नाट्य उपक्रमांतून नाटकाविषयी जनजागृती घडवण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य नाट्यपरिषदेने केलं आहे, त्याबद्दल मी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. नवोदित कलाकारांना आणि रसिकांनासुद्धा नाट्यपरंपरा आणि नाटकांच्या विविध प्रकारांची माहिती व्हावी यासाठी घेतलेली मेहनत स्तुत्य आहे. आपली नाट्यसंस्कृती अव्याहतपणे विकसित व्हावी यासाठी सांस्कृतिक विभागाद्वारे मी कायम नाट्य परिषदेच्या पाठीशी उभा राहीन याची खात्री देतो."
तर मा. आशिषजी शेलार यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शताब्दी निमित्त आज आपण सगळे जमलो आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही अशा एखाद्या मोठ्या संस्कृतीची शंभरी होते आणि ती साजरी केली जाते ही कल्पनाच खूप सुखावह आहे. विष्णुदास भावे यांनी सादर केलेल्या पहिल्या रचनेपासून ते आजपर्यंत अशी नाट्यसंस्कृतीची शंभर वर्ष आपण मानत आलो आहोत. परंतु अनेक पुरावे आणि दावे सांगतात, आपली नाट्यपरंपरा खूप आधीपासून असंख्य लोककलांमधून मांडली गेलेली आहे. याचं खोलात जाऊन संशोधन व्हायला हवं. सत्य पडताळणं गरजेचं आहे कारण आपल्याला हे जगाला सांगता आलं पाहिजे की Freedom of expression तुम्ही नंतर आणलं असेल पण हे कलेचे स्वातंत्र्य इतरांच्या विचारात ही नसेल तेव्हापासून आपल्या गावांत आहे. नाट्यसंस्कृतीची परंपरा यावर शोधप्रबंध होणे गरजेचे आहे, मी खारगे साहेबांच्या संमतीने इथे सूचित करू इच्छितो, विशेषज्ञांची एक समिती नेमावी, त्यासाठी लागणारा सर्व खर्च राज्यसरकार नक्की करेल याची मी खात्री देतो. शिवाय मी नाट्य परिषदेचे सुद्धा अभिनंदन करतो या शताब्दी महोत्सवादरम्यान वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भाषा हे संवादाचं माध्यम आहे आणि नाट्य परिषदेने बहुभाषिक नाट्यकलेला महत्त्व दिले हे फारच स्पृहणीय आहे."
सांगता सोहळ्यावेळी 'चिनाब से रावी तक', '१४ इंचाचा वनवास', 'अविघ्नेया' या नाट्यकृतींचा आस्वाद रसिकांनी घेतला. कार्यक्रमाच्या अखेरीस नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी उपस्थित मान्यवर आणि रसिकांचे आभार मानत हा नाट्यमहोत्सव इतक्या मोठ्या संख्येने नावाजला गेल्याबद्दल आभार मानत रसिक मायबाप प्रेक्षकांप्रती कृतज्ञता यावेळी व्यक्त केली.
संमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल यांच्या संकल्पवर आधारील दिनांक 20 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या नाट्य सोहळ्यात बंगाली, तमिळ, हिंदी, मराठी भाषांतील नाटके, दीर्घांक, संमेलनानिमित्त घेण्याच आलेले नाट्यजागर स्पर्धेतील विजेत्या एकांकिका, बालनाट्य, नाट्यवाचन, एकपात्री, नाट्यछटा, नाट्य परिषद शाखेचे कार्यक्रम इत्यादि कार्यक्रम सादर करण्यात आले.
Comments
Post a Comment