रहस्य आणि संघर्षाचा थरारक अनोखा अनुभव देण्यासाठी ‘दशमी’ सज्ज
रहस्य आणि संघर्षाचा थरारक अनोखा अनुभव देण्यासाठी ‘दशमी’ सज्ज
प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा असा चाहतावर्ग असतो.आपल्या आवडत्या कलाकाराला मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेता, अनेक नामवंत कलाकारांच्या सहभागातून साकारलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. याच पार्श्वभूमीवर, येत्या २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘दशमी’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना अनेक नामवंत कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी अनुभवता येणार आहे.
मकरंद अनासपुरे, गौरी इंगवले, महेश मांजरेकर, विजय निकम, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासह दाक्षिणात्य अभिनेते रवि प्रकाश यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिरेखेला स्वतंत्र ओळख देण्याचा प्रयत्न केला असून, या विविध व्यक्तिरेखांमधील वेगळेपण प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. आपल्या भूमिकांना प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला आहे.
केएनके बॉक्स प्रस्तुत योगेश भोसले दिग्दर्शित ‘दशमी’ हा चित्रपट सस्पेन्स, क्राईम, थरार आणि सामाजिक वास्तव यांचा प्रभावी मिलाफ साधणारा आहे. वेगळ्या धाटणीची दिग्दर्शन शैली, थरारक अॅक्शन दृश्ये, उत्कंठावर्धक पटकथा आणि प्रभावी संकलन यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक वेगळा चित्रपटानुभव देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. दमदार व्यक्तिरेखा, अॅक्शन, भावनिक प्रसंग आणि सूडनाट्य यांची सांगड घालत ‘दशमी’ उत्कंठावर्धक कथानक प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे.
चित्रपटाच्या वैशिष्ट्यांविषयी बोलताना दिग्दर्शक योगेश भोसले सांगतात, “दमदार व्यक्तिरेखा, अॅक्शन, भावनिक गुंतागुंत आणि सूडनाट्य यांचा प्रभावी संगम ‘दशमी’मध्ये पाहायला मिळणार आहे. कथानकाची मांडणी, दिग्दर्शनशैली आणि तांत्रिक बाजू यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी निश्चितच एक खास आश्चर्य ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

Comments
Post a Comment