स्वरांजली: नानावटी सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटलतर्फे
महासाथीतील हिरोंना मानवंदना
मुंबई, 31 डिसेंबर, 2020: नानावटी सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटलच्या वतीने ‘स्वरांजली: एक साल, एक सफर, एक सलाम’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महासाथीत समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या लढवय्यांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने 30 डिसेंबर रोजी ही सूरमयी मानवंदना देण्यात आली. ही व्हर्च्युअल कलाकृती नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ स्पाईन सर्जरीचे डॉ. मिहीर बापट यांच्या कलात्मकतेचा आविष्कार ठरली. महामारी दरम्यान अनेक वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली, त्यांना पाठबळ देण्याचा उद्देश यामागे होता.
डॉ. समीर दलवाई हे या कार्यक्रमाचे यजमान होते. तर डॉ. बापट, डॉ. संजय नाबर, डॉ. अनिश सबनीस, डॉ. अग्निश पतियाळ आणि डॉ. जागृती पार्थिव संघवी या नानावटी हॉस्पिटलच्या गायक महारथींनी कार्यक्रमात बहार आणली. दिमाखदार ऑर्केस्ट्रा माहीम ग्रुपच्या सुंदर वादक कलाकारांसह युट्युबवर 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता (बुधवार) ही सुरेल मैफल रंगली होती.
अचानक निर्माण झालेल्या महासाथीने समाजातील विविध घटकांवर विपरीत परिणाम झाला. वादक कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना नवी उमेद मिळावी म्हणून नानावटी सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल आणि ऑर्केस्ट्रामाहीम ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने सूरमयी संध्याकाळ रंगली होती. दरदिवशी मरणाशी मुकाबला करणारे, आघाडीवर असणारे आरोग्य रक्षक समाज हिताच्या कामासाठी सरसावले. वादक कलाकारांना साथ देण्यासाठी पुढे आले.
या उपक्रमाला आपले समर्थन दर्शविण्यासाठी महान अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्तिश: एक व्हिडीओ संदेश ध्वनीमुद्रित केला. “संगीताच्या रंगारंग कार्यक्रमात आपल्या प्रतिभावंत डॉक्टरांनी बहार आणली. त्यांनी समाजासाठी आपले सेवाव्रत तर जपलेच, शिवाय अशा अनिश्चित काळात मोठ्या जिद्दीने आणि लक्ष केंद्रित करून आपली कामाप्रती असलेली निष्ठा पाळून समाजाची सेवा करत आहेत. महासाथीचा मोठा फटका वादक कलाकार मंडळीना बसला. त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून, त्यांना नवसंजीवनी देण्याच्या अनुषंगाने आरोग्य रक्षकांनी हे अनोखे पाऊल उचलले आहे. हा जलसा नक्कीच पाहायला हवा,” ते म्हणाले.
डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रचंड लोकप्रिय गायक जावेद अली यांनी आपल्या शुभेच्छा नोंदवल्या. ते म्हणाले की, “आपल्या मित्रवत कलाकार मंडळींसाठी ही महासाथ मोठी कठीण ठरली. डॉ. मिहीर बापट तसेच नानावटी सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटलच्या अन्य डॉक्टरांनी काळाची गरज ओळखून पाऊल उचलले. या कार्यक्रमाला मोठे यश मिळेल, हा आत्मविश्वास मला वाटतो. डॉक्टरांचे प्रयत्न नक्कीच फळाला येतील!”
Comments
Post a Comment