'पीएसपी-एएसआयएस कॉन्क्लेव्ह'..
'एआय'मुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम, प्रभावी व सुसज्ज होईल'
- संतोष वारिक यांचे प्रतिपादन; 'पीएसपी-एएसआयएस कॉन्क्लेव्ह'मध्ये सुरक्षा क्षेत्रातील 'एआय'च्या वापरावर चर्चा
मुंबई: "कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे सुरक्षा यंत्रणांमधील देखरेख आणि नियंत्रण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या निरीक्षणामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास संशयास्पद हालचाली ओळखण्यासह संभाव्य धोके वेळीच लक्षात घेऊन तातडीने प्रतिसाद देणे शक्य होईल," असे प्रतिपादन महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिक यांनी केले. 'एआय'मुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम, प्रभावी आणि सुसज्ज होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स व अमेरिकन सोसायटी फॉर इंडस्ट्रियल सिक्युरिटी (एएसआयएस) यांच्या संयुक्त विद्यमाने 'एआय इन सिक्युरिटी' संकल्पनेवर 'पीएसपी-एएसआयएस कॉन्क्लेव्ह'चे आयोजन केले होते. यामध्ये 'अग्निसुरक्षेमध्ये एआयचा वापर' यावर वारिक बोलत होते. मुंबईतील आयकॉनिका हॉटेल येथे झालेल्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे सहसंचालक किरण हत्याल, 'पीएसपी'चे सहसंस्थापक सुनील बीडलम व मंगेश काटे, बँक ऑफ बडोदाच्या सुरक्षा विभागाचे राष्ट्रीय प्रमुख ब्रिगेडियर प्रीतपाल सिंग, सिक्युरिटी शेल्स इंफोटेकचे संचालक महेश गव्हाणे, बायॉन अनॅलिटीक्सचे व्यवस्थापकीय संचालक राजीव नायर, सुरक्षा सेवा क्षेत्रातील प्रमुख अधिकारी नंदकिशोर भट, मोहित भूगणि, कुणाल भोगल, स्वप्नील कुटे, सुमित शहा, ब्रिगेडियर सुनील कुमार, सिमएक्सचे पूर्वेस गडा, 'एएसआयएस' मुंबई चॅप्टरचे समीर कुमार झा, मार्श मिरांडा, प्रमोद भिलारे, राकेश खेरवा, संपत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. एचएसबीसी बँक इंडियाचे उपाध्यक्ष (प्रोटेक्टिव्ह सिक्युरिटी) निलेश गाडेकर व हॉटेल ग्रँड हयात मुंबईचे सहायक सुरक्षा व्यवस्थापक संतोष भालके यांना सुरक्षा सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
संतोष वारिक म्हणाले, "सद्यस्थितीत इमारतींची सुरक्षा आणि आगीपासून बचाव (फायर सेफ्टी) या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या बनल्या आहेत. कारखाने, कार्यालये किंवा मॉलमध्ये लोकांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासह संपूर्ण व्यवस्थापन ‘एआय’च्या माध्यमातून करणे शक्य झाले आहे. तसेच, इमारतींमधील आगीच्या सुरक्षेच्या यंत्रणांवरही ‘एआय’द्वारे नजर ठेवता येणे सहज शक्य आहे. शासनाने ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट’ मध्ये २०२३ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. इमारतीमध्ये आगीच्या सुरक्षेसाठी बसवलेले डिटेक्शन सिस्टीम्स, अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्सद्वारे आपत्कालीन स्थितीत अलर्ट पाठवले जातात. त्यामुळे कोणत्याही दुर्घटनेवेळी अग्निशमन दलाचा प्रतिसाद लवकर मिळण्यास मदत होईल."
प्रास्ताविकात सुनील बीडलम यांनी सांगितले की, पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स (पीएसपी) फोरम हे पुण्यातील कॉर्पोरेट, औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सुरक्षा, रिस्क मॅनेजमेंट आणि ऍनालिसिस करणाऱ्या व्यावसायिकांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय घडामोडी, सुरक्षारक्षकांशी संबंधित आव्हाने, प्रवेश नियंत्रण प्रणाली, आपत्कालीन स्थितीतील सज्जता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाते. पुण्यासह मुंबई आणि अन्य शहरांत या स्वरूपाचे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘सुरक्षा अवॉर्ड्स’सारख्या उपक्रमांद्वारे सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरवही फोरमतर्फे केला जातो."
ब्रिगेडियर प्रीतपाल सिंग म्हणाले, "एआयच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि भविष्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दिशा मिळाली. आज लहान-मोठ्या सर्वच गोष्टी इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. इंटरनेटमुळे एआयसारखे प्रभावी तंत्रज्ञान उपलब्ध झाले असले, तरी त्यावर योग्य नियंत्रण नसल्यास गैरप्रवृत्तींचे लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करू शकतात. त्यामुळे सुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिकांनी एआयचे स्वरूप समजून घेणे, त्याचा योग्य वापर करणे आणि संस्थांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे." सूत्रसंचालन मृणालिनी चतुर्वेदी यांनी केले. मंगेश काटे यांनी आभार मानले.


Comments
Post a Comment