अशोक खरातची भूमिका साकारणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता!

अशोक खरातची भूमिका साकारणार हा प्रसिद्ध अभिनेता! 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' मधील गूढ उकललं..

'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' सिनेमात अभिनेता मनोज जोशी अशोक खरातची भूमिका साकारणार आहेत. दीपाली सय्यद आणि सुबोध भावेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून सिनेमा २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.                                       

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, या सिनेमात कोणते कलाकार कोणत्या राजकीय व्यक्तींच्या भूमिका साकारणार, याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकांवरील पडदा आता हटवण्यात आला आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या भूमिकेत दिग्गज अभिनेते मनोज जोशी झळकणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं आहे    

'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' या सिनेमात अशोक खरातची भूमिका कोण साकारणार, हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून अभिनेता मनोज जोशी या भूमिकेत दिसणार आहेत. मनोज जोशी यांनी हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विनोदी भूमिकांपासून ते गंभीर व्यक्तिरेखांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सिनेमाचा ट्रेलर समोर आल्यानंतर मनोज जोशी यांची देहबोली आणि लूक सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांचा लूक अशोक खरातच्या व्यक्तिरेखेशी मिळताजुळता असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.                            

या सिनेमात अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद यांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या रुपाली चाकणकरांशी संबंधित भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती समोर येणे बाकी आहे. तसेच अभिनेता सुबोध भावेही या सिनेमात झळकणार असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.                            

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा करण्यात आला. तसेच काही राजकीय व्यक्तींशी संबंधित फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' हा सिनेमा २० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable