वाराणसीत २२ ते २४ जुलै दरम्यान भरणार जगातील सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन व प्रदर्शन

वाराणसीत २२ जुलै ते २४ जुलै दरम्यान भरणार जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन व प्रदर्शन   

अशा प्रकारच्या पहिल्याच ज्ञानाचे आदानप्रदान करणाऱ्या कार्यक्रमात, चर्चासत्रे, सादरीकरणे, कार्यशाळा व मास्टर क्लासेसच्या माध्यमातून, मंदिर व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींवर प्रकाश टाकला जाणार

२५ देशांतील हिंदू, शीख, बौद्ध व जैन धर्मांच्या भक्तीपर संस्था या अधिवेशनात सहभागी होणार आहेत

• या तीन दिवसांच्या सोहळ्यामध्ये ४५०हून अधिक प्रख्यात मंदिरांतील प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित राहणार

• भक्तांचा अनुभव व सुविधा अधिक उंचीवर नेणे हा या अधिवेशनाचा गाभा

मुंबई,१४ जुलै २०२३: इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो, भारतातील सर्वांत पुरातन शहर वाराणसी येथील रुद्राक्ष कन्वेन्शन सेंटरमध्ये, २२ ते २४ जुलै, २०२३ दरम्यान घेतले जाणार आहे. टेम्पल कनेक्टने (इंडिया) विकसित केलेला हा केवळ मंदिर व्यवस्थापनाला समर्पित असा जगातील पहिला कार्यक्रम आहे. मंदिर परिसंस्थेतील प्रशासन, व्यवस्थापन व कामकाजाची जोपासना आणि सक्षमीकरणावर या कार्यक्रमाचा भर असेल. 

टेम्पल कनेक्टचे (भारतीय मूळ असलेल्या संस्थांशी निगडित माहितीचे दस्तावेजीकरण, डिजिटायझेशन व वितरण ह्यांना समर्पित असलेला आघाडीचा प्लॅटफॉर्म) गीरेश कुलकर्णी ह्यांनी प्रसाद लाड (अध्यक्ष, इंटरनॅशनल टेम्पल्स कन्वेन्शन अँड एक्स्पो २०२३ तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार) आणि शोच्या संचालक व सहक्युरेटर मेघा घोष यांच्या सहयोगाने ही संकल्पना विकसित केली आहे. या तीन दिवसांच्या कार्यक्रमात अध्ययन व मंदिर व्यवस्थापनाची धुरा वाहणाऱ्या समविचारी आतिथींमध्ये कल्पना, शिक्षण व अमूल्य माहितीचे आदानप्रदान मुक्तपणे होणार आहे. जगभरातील मंदिर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांमध्ये सर्वोत्तम पद्धती प्रस्थापित करण्याच्या, त्या त्यांच्या आवाक्यात आणण्याच्या  व त्यांना बढावा देण्याच्या दृष्टीन हे केले जाणार आहे. 

हे अधिवेशन भाविक पर्यटन व तीर्थस्थळ परिसंस्थेमध्ये मूल्यवर्धन करणारे असल्याने भारत सरकारच्या ‘अविश्वसनीय भारत’ उपक्रमाखाली पर्यटन मंत्रालयाने याला पाठिंबा दिला आहे. 

आयटीएक्सपुढे नेटवर्किंग, ज्ञानाचे आदानप्रदान व सहअध्ययनाची परिसंस्था निर्माण करण्याचे व जोपासण्याचे ध्येय आहे. तज्ज्ञांचे परिसंवाद, कार्यशाळा व विविध विषयांवरील मास्टर क्लासेसच्या माध्यमातून या ध्येयाची परिपूर्ती केली जाणार आहे. यांमध्ये मंदिराची सुरक्षितता, संरक्षण व टेहळणी, निधी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य तसेच सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या (एआय) नवीन युगातील तंत्रज्ञानांचा उपयोग आदी विषयांचा समावेश होतो. तसेच एक भक्कम व जोडलेला मंदिर समुदाय उभा करण्याच्या दृष्टीने सोशल मीडिया व्यवस्थापनाचाही यात समावेश होतो. गर्दीचे तसेच रांगांचे व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आणि भक्तांच्या अनुभवांच्या आधारे पायाभूत सुविधांचा विकास या विषयांनाही कार्यक्रमादरम्यान घेण्यात येणार आहे. 

हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी असून याच्या पहिल्या आवृत्तीची आखणी हिंदू, जैन, बौद्ध व शीख प्रार्थनास्थळे व प्रार्थनास्थळांच्या ट्रस्ट्ससाठी करण्यात आली आहे. जैन धर्मशाळा, आघाडीच्या भक्तीपर सेवाभावी संस्था, ग्रेट ब्रिटनमधील हिंदू मंदिरांच्या संघटना, इस्कॉन टेम्पल्स, अन्न क्षेत्र व्यवस्थापने, अनेक तीर्थक्षेत्रांवरील पुरोहित महासंघ व पिल्ग्रिमेज प्रमोशन बोर्ड्स ह्यात सहभागी होणार आहेत. 

शिवाय, हे अधिवेशन, जगभरातील मंदिरांमधील वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरा, कला व कारागिरी यांच्याबद्दल जाणून घेण्याचे व्यासपीठ ठरणार आहे. त्याचबरोबर भारतातील मंदिरांच्या समृद्ध वारशाचा गौरवही या कार्यक्रमात होणार आहे. 

३ दिवसीय सत्रांतील ठळक वैशिष्ट्ये:

डॉ. मोहन भागवत (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक) यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला अनेक मंदिरांचे विश्वस्त, मंदिर मंडळांचे व ट्रस्ट्सचे सदस्य यांच्यासह अनेक द्रष्टे नेते उपस्थित राहणार आहेत. त्रावणकोरचे राजपुत्र (पद्मनाभस्वामी मंदिर), रोहन ए. खाउंटे (पर्यटन, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार, मुद्रण व स्टेशनरी मंत्री, गोवा), धर्मा रेड्डी (कार्यकारी अधिकारी- तिरुमला तिरुपती देवस्थानम) यांच्यासह अनेक महत्त्वाचे आतिथी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सर्वांगीण प्रभाव निर्माण करण्यासाठी, कार्यक्रमातील सत्रांमध्ये, शाश्वत मंदिर व्यवस्थापन व विकासाला शिस्त आणण्याच्या दृष्टीने तावून सुलाखून झालेल्या तसेच नवीन युगातील अशी दोन्ही प्रकारच्या पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. ग्रीन एनर्जी, पुरातत्त्वीय स्थापत्य, लंगर (सामुदायिक स्वयंपाकघर) व्यवस्थापन, मंदिरांतील प्रकाशाची रोषणाई आदी विषयांवर संभाषण घडवून आणले जाणार आहे. यामध्ये तिरुपती बालाजी मंदिरातील तज्ज्ञ त्यांच्या निर्दोष रांग व्यवस्थापनाबद्दलची माहिती देणार आहेत तसेच वाराणसी येथील घाटांची स्वच्छता व देखभाल करणाऱ्या सेवाभावी/सामाजिक संस्थाही त्यांच्या कामाची माहिती देणार आहेत. कन्वेन्शनचे संस्थापक गीरेश कुलकर्णी मंदिरांच्या अर्थशास्त्रावर तसेच पर्यटनातील त्याच्या विस्तारित भूमिकेवर सत्र घेणार आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते आणि भाविकांना स्मरणीय अनुभव देणाऱ्या एखाद्या ठिकाणाला बढावा मिळू शकतो.

काशी विश्वनाथ मंदिर, महाकाल ज्योतिर्लिंग, अयोध्या राममंदिर, पटना साहेब गुरुद्वारा, चिदंबरम मंदिर व हम्पीचे विरूपाक्ष मंदिर यांचे प्रतिनिधी अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा तसेच सत्रे घेणार आहेत. 

मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात शाश्वतता, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य व समुदाय सेवेच्या क्षेत्रांत सीएसआरचे काम करणाऱ्या अंत्योदय प्रतिष्ठानचा पाठिंबा या कार्यक्रमाला आहे.  

सेवा व उत्पादनांचे बूथ

अधिक चांगल्या मंदिर व्यवस्थापनासाठी प्रणालींमध्ये तसेच एसओपींमध्ये सुधारणा करणाऱ्या नवोन्मेष्कारी उत्पादने व सेवांची निवडक यादी  आयटीसीएक्सने तयार केली आहे आणि त्यांना त्यांची उत्पादने निमंत्रितांपुढे प्रदर्शनात मांडण्यासाठी आमंत्रण दिले आहे. यामध्ये फिनटेक आणि व्यवहार व्यवस्थापन/मोनेटायझेशन साधने, आभासी संवादी नकाशांचे स्क्रीनिंग, मंदिरांच्या आवारांमध्ये आरोग्य एटीएम्स, मंदिरांना ऑनलाइन संवाद साधण्यात मदत करण्यासाठी सोशल मीडिया व वेब तंत्रज्ञाने, मंदिरांच्या स्वच्छतेसाठी रासायनिक व स्वच्छतेची उत्पादने यांचा समावेश होतो. 

वामा, एचडीएफसी, मेटा सोशल, डायव्हर्सिटी केमिकल्स, योनो मेटा, युनिटी आयई वर्ल्ड, वैदिक भवन ऋग्वेदालय, इंडियन पूजा कंपनी, किस्ट्ल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आणि वोकसारा टेक्नो सोल्युशन्स यांसारख्या काही कंपन्यांचा यात समावेश होतो. 

टेम्पल कनेक्ट आणि आयटीसीएक्सचे संस्थापक गीरेश कुलकर्णी म्हणाले, “भक्तीच्या कर्तव्यात अग्रेसर असलेले टेम्पल कनेक्ट प्रार्थनास्थळांवरील भाविकांचा अनुभव अधिक उंचीवर नेण्यासाठी बांधील आहे. लोकांना विश्वासाच्या माध्यमातून आकर्षित करणाऱ्या या पवित्र भूमीतील कामकाज सुरळीत चालणे अपरिहार्य आहे. रांगांमध्ये ठराविक अंतरावर बसण्यासाठी बाके, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच भक्तांनी मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यापासून त्यांच्या अनुभवाची काळजी घेणारा सुसंघटित प्रभाव हे सर्व आवश्यक आहे. इंटरनॅशनल टेम्पल्स कन्वेन्शन अँड एक्स्पोमध्ये मंदिरांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या शिलेदारांना एका व्यासपीठावर आणून प्रेरणा प्राप्त करण्याचे तसेच मंदिरात नियमित कामकाज प्रणाली स्थापित करून हळूहळू तिची उंची वाढवण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे.”

इंटरनॅशनल टेम्पल्स कन्वेन्शन अँड एक्स्पो २०२३चे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले, “सर्वांत पुरातन परिसंस्थांपैकी एक समजली जाणारी मंदिर परिसंस्था बळकट व सक्षम करण्याचा पायाभूत प्रयत्न आयटीसीएक्स करत आहे. या अधिवेशनाचे हे पहिले पर्व नक्कीच अशा मोठ्या प्रमाणात आणि सर्व शक्तीनिशी आयोजित केले जाणारे अशा प्रकारचे पहिलेच पर्व आहे. माहितीच्या प्रसारासाठी आवश्यक असलेले व्यासपीठ या अधिवेशनाद्वारे पुरवले जाणार आहे. या व्यासपीठावर विविध मंदिर व्यवस्थापने एकत्र येऊ शकतील, एकमेकांपासून शिकू शकतील, तज्ज्ञांशी जोडून घेऊ शकतील, समन्वय निर्माण करू शकतील आणि शाश्वत मंदिर व्यवस्थापनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतील.”

शोच्या संचालक व सहक्युरेटर मेघा घोष सांगतात,  “सध्याच्या काळात पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. मंदिर व्यवस्थापनासाठी मंच तयार करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत कोणीही केलेला नव्हता पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असते. या अधिवेशनामुळे आपल्या समृद्ध मंदिर वारशाबद्दल राष्ट्रव्यापी अभिमानाची भावना पुढे आली आहे. नवीन युगातील तंत्रज्ञानाच्या मदतीने हा वारसा सुरक्षित राखण्याची व त्याला पाठबळ देण्याची गरज आहे. आम्ही समान मुळे असलेल्या चार धर्मांसह याची सुरुवात करत आहोत. येत्या काही वर्षांत अधिकाधिक धर्म या चळवळीत सहभागी झाले तर आम्हाला आवडेल.”  

या अधिवेशनाचे टेम्पल कनेक्ट वेबसाइटवरून तसेच नोंदणीकृत प्रेक्षकांसाठी फेसबुक लाइव्हमार्फत ऑनलाइन स्ट्रीमिंग केले जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..