पॅरा खेलो इंडिया स्पर्धा

महाराष्ट्राला पदार्पणातल्या स्पर्धेत पाचवे स्थान

- अखेरच्या दिवशी टेबल टेनिसमध्ये दोन सुवर्ण

- नेमबाजीत महाराष्ट्राला उपविजेतेपद

नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि साई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने १२ सुवर्ण, ७ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह पाचवे स्थान मिळविले. 

स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदकांची कमाई करून दिली. महिला विभागात  पृथ्वी बर्वेला रौप्यपदकाची मानकरी ठरली. नेमबाजीत महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. 

स्पर्धेत हरियाना ४० सुवर्ण, ३९ रौप्य आणि २६ कांस्य अशा १०५ पदकांसह आघाडीवर राहिले. उत्तर प्रदेशने (२५, २३ १४) अशा ६२, तमिळनाडूने (२०,८, १४) ४२, तर गुजरातने (१५, २२, २०) ५७ पदकांसह अनुक्रमे दुसरे,तिसरे आणि चौथे स्थान पटकावले. 

टेबल टेनिसमध्ये दत्तप्रसाद, विश्वला सुवर्ण

टेबल टेनिस प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तरप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. पृथ्वी बर्वेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या क्लास ९ प्रकारात दत्तप्रसदाने हरियानाच्या रविंदर यादवचे तगडे आव्हान ११-३, ११-८, ९-११, १२-१० असे परतवून लावले. क्लास १० प्रकारात विश्वने तेलंगणाच्या हितेश दलवाणीचा कडव्या संघर्षानंतर पाच गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत ११-७, ६-११, १३-११, १६-१८, ११-८ असा पराभव केला. दोन गेमची बरोबरी झाल्यावर निर्णायक पाचव्या गेमला विश्वने कमालीच्या एकाग्रतेने खेळ करताना एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. 

महिलांच्या क्लास ९-१० प्रकारात पृथ्वीला तमिळनाडूच्या बेबी सहानाचा प्रतिकार करता आला नाही. बेबीने सरळ तीन गेममध्ये ११-३, ११-६ आणि ११-३ असा विजय मिळविला. 

नेमबाजीत महाराष्ट्र उपविजेते

नेमबाजी क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने पदार्पणातच उपविजेतेपदाचा मान मिळविला. स्वरुप उन्हाळकर आणि वैभवराजे रणदिवे यांच्या महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा होता. कोल्हापूरच्या स्वरुपने पुरुषांच्या १० मीटर एअकर रायफल एसएच १ प्रकारात सुवर्ण, तर वैभवने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात एसएच १ प्रकारातच कांस्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्याया यशाबद्दल प्रशिक्षक अनुराधा खुडे यांनी समाधान व्यक्त केले. 

कामगिरी कौतुकास्पद

प्रत्यके खेळाडूने घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळू शकले, असे खुडे म्हणाल्या. स्वरुपने आपला आंतरराष्ट्रीय अनुभव पणाला लावला. वैभवनेही अचूक कामगिरी करताना कांस्यपदकाला गवसणी घातली. पदार्पणाच्या स्पर्धेत नेमबाजांनी केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही खुडे म्हणाल्या. 

महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक - दिवसे

पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी उपलब्ध वेळेत जबरदस्त सराव करून महाराष्ट्राला स्पर्धेत पाचवे स्थान मिळवून दिले. खेळाडूंची कामगिरी निश्चित कौतुकास्पद असून, भविष्यात हे खेळाडू देखिल आदर्श म्हणून उभे राहतील यात शंका नाही. ॲथलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजी, टेबल टेनिस आणि पॉवर लिफ्टिंग प्रकारात सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन, अशा शब्दात राज्याचे क्रीडा संचालक सुहास दिवसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

खेळाडूंचा अभिमान वाटतो - संजय बनसोडे

पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत यश मिळविणाऱ्या आणि सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूचा अभिमान वाटतो. त्यांच्या कामगिरीने महाराष्ट्राचा गौरव उंचावला आहे. भविष्यात या कामगिरीत निश्चित प्रगती होईल. या वेळी महाराष्ट्राने सहभाग घेतलेल्या सर्व क्रीडा प्रकारात किमान एक तरी पदक मिळविले आहे. सर्व खेळाडूंचे  अभिनंदन अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..