'बाबू'तून वैष्णवी कल्याणकरचे मोठ्या पडद्यावर पदार्पण ..
'बाबू'तून वैष्णवी कल्याणकरचे मोठ्या पडद्यावर पदार्पण
विविध मालिकांमधून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर. अल्पावधितच वैष्णवीने प्रेक्षकांना आपलेसे केले. आता वैष्णवी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच तिची चित्रपटातील झलक सोशल मीडियावर झळकली आहे. सरळ, साधी, सालस असणारी ही 'झुळूक' तरुणांना भावणारी आहे.
आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल वैष्णवी कल्याणकर म्हणते, '' मोठ्या पडद्यावर मी पहिल्यांदाच झळकणार आहे. त्यामुळे आनंदी, उत्साही, थोडीशी धाकधूक अशा विविध भावना सध्या मी अनुभवतेय. यात मी 'झुळूक'ची व्यक्तिरेखा साकारतेय, जी खूपच सोज्वळ, निरागस आहे. तरुणींना ही व्यक्तिरेखा आपल्या खूप जवळची वाटेल. जणू काही ही आपल्याच घरातली आहे, असे वाटेल. एका मालिकेदरम्यान मी 'बांबू'मधील 'झुळूक'साठी ऑडिशन दिले होते. माझी निवड झाली आणि प्रॉडक्शनकडून मला एकदा सकाळी सात वाजता पुण्याला बोलवले. आमची ही मीटिंग सुमारे पाच तास चालू होती. त्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरु झाली. आता लवकरच 'झुळूक' तुम्हाला भेटायला येणार आहे.''
क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. तर या चित्रपटाचे लेखन अंबर हडप यांनी केले आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बांबू' येत्या २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Comments
Post a Comment