मोबाईल स्क्रिनमधून मुलांना बाहेर काढणारे हिरवंगार बालनाट्य...
मोबाईल स्क्रिनमधून मुलांना बाहेर काढणारे हिरवंगार बालनाट्य
हल्लीची लहान मुले त्यांच्या सुट्टीच्या दिवसात मोबाईलवरील गेम खेळण्यात किंवा इतर करमणुकीचे व्हिडिओ पाहण्यात मग्न झालेले दिसून येतात. या पिढीला मोबाईलच्या विश्वातून बाहेर आणण्यासाठी लाईट अँड शेड प्रकाशित आणि ग्रीन सिग्नल एन्टरटेंमेंट निर्मित ‘Ghost एका जंगलाची’ हे बालनाट्य खास आपल्या बालमित्रांच्या भेटीला घेऊन आले आहेत. थिएटर कोलाजच्या २७ बालकलाकार आणि योगेश खांडेकर, शिल्पा साने या कलाकारांनी या नाटकात अभिनय केला आहे.
काही लहान मुलांचा समुह जंगलात मोबाईल व्यतिरिक्त वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाला जातात. त्याठिकाणी त्यांना येणाऱ्या अडथळ्यांवर ते कशाप्रकारे स्वतःचे आणि आपल्या मित्र-मैत्रीणीचे संरक्षण करतात हे थिएटर कोलाजच्या पल्लवी वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘Ghost एका जंगलाची’ या बालनाट्यात पाहायला मिळणार आहे.
लहानमुलांचे गोड संवाद, कमाल अभिनय आणि धमाल अविष्कारासह रोमांचक, गुढ, साहस आणि सामाजिक संदेश यावर आधारित हे बालनाट्य आहे. या नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले आहे. ग्रीन सिग्नल एन्टरटेंमेंट च्या अनघा विजू माने यांनी या बालनाट्याची निर्मिती केली आहे. लाईट अँड शेड चे संदीप वेंगुर्लेकर यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच या बालनाट्यासाठी संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, श्याम चव्हाण प्रकाशयोजना, अनुराग गोडबोले संगीत, अनिल सुतार नृत्य दिग्दर्शन, उल्हेश खंदारे रंगभूषा आणि सुहानी मांदूस्कर यांनी वेशभूषेचे काम पाहिले आहे.
या नाटकाचा शुभारंभ प्रयोग रविवार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता श्री शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे.
Comments
Post a Comment