....आणि होम मिनिस्टरची संपूर्ण टीम झाली भावूक
दार उघड वाहिनी दार उघड म्हणत २००४ साली सुरु झालेला होम मिनिस्टरचा प्रवास गेली १७ वर्ष अविरत सुरु आहे. ‘गोकुळाष्टमी विशेष भाग सुरु असताना कॅमेरामनची धुरा सांभाळण्यासाठी एक मुलगी आली आणि संपूर्ण होम मिनिस्टरची टीम भावूक झाली. कारण ह्याच प्रवासात अगदी सुरवातीपासून साथ देणारे कॅमेरामन शशी गायकवाड यांची ती मुलगी भाग्यश्री शशी. शशी गायकवाड डिसेंबर २०१७ ला ‘होम मिनिस्टर’च्या आपल्या कुटुंबाला सोडून कायमचे निघून गेले.
या आठवणींना उजाळा देत आदेश बांदेकर म्हणाले की, "शशी आमच्यात नाही हा आमच्यासाठी एक धक्काच होता, शूटिंग सुरु झालं की शशी समोर दिसायचा. आपल्या घाटकोपरच्या छोट्याश्या घरात कुटुंबासमवेत राहत असताना त्यांनी खूप अडचणींचा सामना केला. परिस्थिती बेताची असताना देखील ते आपल्या कुटुंबासमवेत खुश असायचे. त्यांच्या मागे त्यांची मुलगी भाग्यश्री हीने देखील ह्याच क्षेत्रात यायचं ठरवलं आणि कॅमेरा मागे काम करताना तिने एक शॉर्ट फिल्म पण शूट केली. आज तिला होम मिनिस्टर चा कॅमेरा हाताळताना पाहून खूप भरून येतंय आणि आनंदही होतोय."
बाबांच्या आठवणींना उजाळा देत भाग्यश्री शशी म्हणाली, "माझे बाबा 'होम मिनिस्टर'मध्ये कॅमेरामन आहेत कट टू मी 'होम मिनिस्टरमध्ये कॅमेरामन आहे.. हा प्रवास माझ्यासाठी फार वेगळा होता. "वडील काम करत होते म्हणून तुलाही काम मिळालं असेल.." असं आजूबाजूचे बरेच लोक बोलताना दिसू लागले आहेत. घरातला एकमेव फिल्म इंडस्ट्रीत काम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा. 'झी' बाबतीत बाबा किती लॉयल होते हे मी लहानपणापासून पाहिलं आहे. हा वारसा आपण पुढे चालवायचा हे खूप आधीच ठरवून ठेवलेलं. या कामाच्या बाबतीत तसं फक्त ऐकून होते. बाबा होम मिनिस्टरसाठी काम करत होते तेव्हा ते घरी आल्यावर वेगवेगळे बरेच किस्से ऐकवायचे. त्यांचं आम्ही जसं एक कुटुंब होतं, तसंच अजून एक जवळचं कुटुंब म्हणजे होम मिनिस्टर. अचानक तीन वर्षांपूर्वी बाबा गेले. पुढे काय करायचं? आपण पाहिलेलं स्वप्नं पूर्ण होईल का? आणि ते पूर्ण करायचं असेल तर किती परीक्षा द्याव्या लागणार? अनेक प्रश्न मनात होते. नंतर एल.एस. रहेजा स्कुल ऑफ आर्टस्मधून मी माझं डिजिटल फिल्ममेकिंगचं शिक्षण पूर्ण केलं. शॉर्ट फिल्म केल्या, मेहेनत करण्याची पूर्ण तयारी होती. शिक्षण पूर्ण झालं खरं पण कामाची बोंब कायम होती. त्यात कोरोनामुळे सगळं ठप्प झालेलं. अचानक काही दिवसांपूर्वी आदेश काकांचा फोन आला.. अचानक आलेल्या एका फोनमुळे माझं अख्खं जग बदललं. खरं तर होम मिनिस्टर ही टीम तर आहेच पण त्यापेक्षा जास्त एक 'कुटुंब' आहे. बाबा गेल्यानंतर पुन्हा या कुटुंबासोबत हसत खेळत राहू की नाही हा प्रश्न पडायचा. या कुटुंबाने मला पुन्हा त्यांच्यात सामावून घेतले, आणि अखेर मी इथे कॅमेरामन म्हणून मी रुजू झाले.. या संधीबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे."
पैठणीचा सन्मान मिळवून देणारा हा कार्यक्रम पाहायला विसरू नका होम मिनिस्टर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर
Comments
Post a Comment