विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना थोडंसं दडपण आहे - हार्दिक जोशी

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतुन प्रेक्षकांचा लाडका राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी एका नव्या भूमिकेतून सगळ्यांच्या भेटीला येतोय. त्याच्या या नवीन मालिकेबद्दल आणि भूमिकेबद्दल त्यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद

१. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी थोडक्यात सांग?
- हि भूमिका खूपच वेगळीच आहे. मी साकारत असलेला सिद्धार्थ हा एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वाढलेला आहे. कुटुंबीय पारंपरिक असल्यामुळे घरचं वातावरण देखील पारंपरिक आहे. सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल मुलगा आहे आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.

२. या भूमिकेसाठी जेव्हा तुला विचारण्यात आलं तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती?
- मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी नाही बोलूच शकलो नाही. झी हे माझं कुटुंब आहे त्यामुळे त्यांना नाही बोलणं माझ्यासाठी शक्यच नाही कारण या वाहिनीने मला याआधी देखील एक वेगळी ओळख दिली. तसेच राणामुळे माझी तयार झालेली इमेज हि खूप वेगळी आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं त्यामुळे मी लगेचच होकार दिला.

३. आधी राणादा सारखी लोकप्रिय भूमिका निभावल्यानंतर आता त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका साकारताना तुला दडपण आहे का?
- नक्कीच थोडंसं दडपण आहे. अजूनही प्रेक्षक मला राणा म्हणून ओळखतात आणि त्याच नावाने हाक मारतात. त्यामुळे सिद्धार्थ म्हणून देखील माझी ओळख व्हावी यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यासाठी भूमिकेची देहबोली, दिसणं, बोलणं यासगळ्याकडे मी खूप लक्ष देतोय. राणा हा खूप इमोशनल होता त्याउलट सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल आहे त्यामुळे विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना मी माझे १०० टक्के देतो आहे. प्रेक्षक देखील राणा सारखंच सिद्धार्थवर पण प्रेम करतील याची मला खात्री आहे.

४. या मालिकेतील तुझी भूमिका आणि तुझ्यामध्ये किती साम्य किंवा किती फरक आहे?
- सिद्धार्थ हा प्रॅक्टिकल आहे आणि मी सुद्धा बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहे. तसंच सिद्धार्थप्रमाणे मला देखील एकत्र कुटुंबपद्धती आवडते.

५. या मालिकेच्या प्रोमोज नंतर प्रेक्षकांकडून/ चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतोय?
- या प्रोमोज मधून प्रेक्षकांनी मला वेगळ्या लुक मध्ये पाहिलं आहे त्यामुळे ते खूप उत्सुक आहेत मला या फ्रेश लुक मध्ये पाहायला. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर आता राणा या व्यक्तिरेखेतून बाहेर येऊन मी काहीतरी नवीन प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेबद्दल खूप आतुरता आहे.
 
६. एकत्र कुटुंबपद्धती आजकाल खूप कमी पाहायला मिळते, तुला एकत्र कुटुंब आवडतं का?
- हो मला एकत्र कुटुंबपद्धती आवडते कारण घर भरलेलं असतं. घरात सणासुदीचं वातावरण असतं. सगळे एकत्र असले कि ती धमाल मस्ती असते त्यामुळे मला एकत्र कुटुंबपद्धती खूप आवडते.

७. ऑफ कॅमेरा सेटवरचा काही किस्सा?
- नुकतंच शूटिंग सुरु झालं आहे पण अगदी थोड्याच दिवसात आम्हा सगळ्यांची गट्टी जमली आहे त्यामुळे आता कुठे धमाल मस्तीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे इथून पुढे किस्से हळू हळू रंगतील.  
८. प्रेक्षकांना काय आवाहन कराल?
- खूप वेगळा विषय घेऊन हि मालिका प्रेक्षकांसाठी झी मराठी वाहिनी सादर करत आहे. हि मालिका बघून प्रेक्षकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धतीबद्दल प्रेम अजून वाढेल. कुटुंब आणि माणसं हि आयुष्यात किती महत्वाची आहेत हे सगळ्यांना कळेल. त्यामुळे या मालिकेचा आनंद प्रेक्षकांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार