शेमारू मराठीबाणा वाहिनी
‘कीर्तन रंगे इंदुरीकर महाराजांसंगे’ शेमारू मराठीबाणा वाहिनीवर
मराठी संस्कृतीचा वारसा जपत नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न शेमारू मराठीबाणा वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत, भक्ती आणि मनोरंजनाचा मिलाफ साधत वाहिनी लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प श्री.इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा खास कार्यक्रम ‘कीर्तन रंगे इंदुरीकर महाराजांसंगे’ १३ फेब्रुवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.
कीर्तनकार ह.भ.प श्री. इंदुरीकर महाराज त्यांच्या विनोदी शैलीतील कीर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्या गोष्टीवर थेट टिका करण्यापेक्षा ती विनोदी शैलीने सांगितली तर तिचा परिणाम अधिक चांगला साधला जातो, हे तंत्र आपल्या प्रत्येक कीर्तनात वापरुन ते मिश्कील शैलीने अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. भक्ती व मनोरंजनाचा अनोखा मिलाफ साधत अभ्यास, बोलण्याची प्रभावी शैली, ग्रामीण भाषेचा लहेजा, हजरजबाबीपणा यामुळे महाराष्ट्रभरात त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम गर्दी खेचतात. आपल्या प्रेक्षकांना हा आनंद घरबसल्या मिळावा यासाठी शेमारू मराठीबाणा वाहिनीने ‘कीर्तन रंगे, इंदुरीकर महाराजांसंगे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या कीर्तनाची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे. रविवार १३ फेब्रुवारी सायंकाळी ७.०० वा. ते रात्रौ १०.०० वा. विशेष भाग पहाता येणार आहे तसेच १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ७.०० वा. ह.भ.प श्री.इंदुरीकर महाराजांच्या लोकप्रिय कीर्तनाचा आस्वाद घेता येणार आहे.
‘जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे’ या उक्तीप्रमाणे आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने निरुपण केलं आहे. कीर्तनातून जनतेला हसवून अंतर्मुख करणारे प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प श्री. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाची खासियत म्हणजे अगदी चालू घडामोडींचा संदर्भ देऊन परिस्थितीविषयी मार्मिक भाष्य करत ते आपल्या निरुपणातून अंजन आणि रंजन अशा दोन्ही गोष्टी साध्य करतात.
Comments
Post a Comment