पूजा कातुर्डेची ‘रविवार डायरीज’
अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री पूजा कातुर्डे वेगळा नाट्यानुभव घेऊन आली आहे.
आपण सगळे जणं काही ना काही शोधत असतो, या शोधाचा प्रवास दाखवणारं रविवार डायरीज हे
नवीन नाटक पूजा तिच्या मित्रमंडळींसोबत घेऊन आली आहे. या नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबईत काही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी, दिग्दर्शक मंगेश कदम, अभिनेता मिलींद फाटक उपस्थित होते.
पूजा या नाटकाबद्दल सांगते, “रविवार डायरीज हा वेगळा प्रयोग आम्ही केला आहे.
आपण सोमवार ते शुक्रवार आपलं काम करतो आणि वीकेण्डला पार्टी करतो. प्रत्येक जण संपूर्ण आठवडा रविवार कधी येतो हे पाहात असतो. आपण सगळ्याच प्रकारे एका चक्रात अडकलो असतो. त्यावरच रविवार डायरीज हे नाटक आहे.”
एका माणसाला शर्ट घ्यायचा असतो, त्यासाठी तो मॉलमध्ये जातो. मनासारखा शर्ट शोधण्यासाठी तो बराच प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो फक्त शर्ट नसतो तर अपेक्षा आणि स्वप्न असतात. त्यासाठी तो मॉलमध्ये अनेक रात्री घालवतो. त्यातून त्याला काय मिळतं ? त्याचा शोध नक्की कसला असतो ? हे दाखवणारा हा नाट्यानुभव आहे. हे ठराविक साच्यातील नाटक न करता नाट्यवाचन, नाट्यानुभव असा हा वेगळा प्रयोग आहे.
“हे नाटक प्रत्येकाला आपलंसं वाटणारं आणि प्रत्येक जण यातून काहीतरी घेऊन जाणारं आहे”,असं पूजा सांगते.
या नाटकाचं लेखन दिग्दर्शन चैतन्य सरदेशपांडेनी केलं आहे. तर पूजा सोबत यात अभिनेत्री दीप्ती लेलेही आहे. या नाटकाचे पुढचे प्रयोग पुणे, नाशिक,धुळे इथेही होणार आहेत.
Comments
Post a Comment