२१ जूनला ‘गाभ’ चित्रपटगृहात..
२१ जूनला ‘गाभ’ चित्रपटगृहात
सर्वसामान्य माणसांचं रोजचं जगणं तसेच दैंनदिन व्यवहारातल्या अनेक गोष्टींचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. निखळ मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणाऱ्या ‘गाभ’ या चित्रपटातही वेगळ्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. अनेक महोत्सवांमध्ये विशेष कौतुक झालेल्या ‘गाभ’ चित्रपटाला सिनेअभ्यासक, समीक्षकांसह रसिकांची पसंतीची दाद मिळाली आहे. आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ २१ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांची आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत.
आशयघन कथानकाला सुमधूर संगीताची जोड देत परिपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट ‘गाभ’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील दादू (कैलास वाघमारे) आणि फुलवा (सायली बांदकर) या दोघांच्या प्रेमामध्ये रेडा कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो याची रंजक कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अभिनेता कैलास वाघमारे व अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी ‘गाभ’ चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे या दोघांसोबत विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत.
छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांचे आहे .
Comments
Post a Comment