देशभक्तीची भावना जागृत करणार 'राष्ट्र'

देशभक्तीची भावना जागृत करणार 'राष्ट्र'

प्रत्येक चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत राहतो आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतो, पण काही चित्रपट मात्र एक ना अनेक कारणांमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात. 'राष्ट्र - एक रणभूमी' हा असाच एक आगामी मराठी चित्रपट आहे, ज्यानं आपल्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांच्या बळावर सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. महामारीमुळं लांबणीवर गेलेला महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारं टायटल असणारा 'राष्ट्र' हा चित्रपट २६ ऑगस्टच्या मुहूर्तावर म्हणजेच यंदा स्वातंत्र्यदिनाच्या नंतरच्या आठवड्यात रसिक दरबारी सादर होणार आहे.

निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली 'राष्ट्र' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. वर्तमान काळातील राजकीय पटलावर सादर होणाऱ्या या चित्रपटात देशभक्तीची भावना जागृत करणारं कथानक पहायला मिळणार असल्याची 'राष्ट्र' या टायटलवरूनच सहज कल्पना येते. महाराष्ट्राच्या मातीतील राजकारणाला राष्ट्रीय पातळीवरील पॅालिटीक्सची जोड देत 'राष्ट्र'च्या माध्यमातून इंदरपाल यांनी मराठी सिनेदिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात त्यांनी आजघडीला अतिशय ज्वलंत असणारा आरक्षणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला आहे. आजच्या प्रगत समाजात आरक्षणाची नेमकी भूमिका काय आहे याचा उहापोह करण्यासाठी या चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी अवतरली आहे. विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, गणेश यादव इत्यादी मराठीतील आघाडीच्या कलाकारांची फौज या चित्रपटात पहायला मिळणार आहे. याखेरीज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन नेतेही 'राष्ट्र'च्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 

कोरोनासारख्या महामारीसोबतच समोर आलेल्या सर्व संकटांवर मात करीत अखेर 'राष्ट्र' प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने निर्माते बंटी सिंग यांनी आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. हा चित्रपट भारतीय राजकारणातील कच्चे दुवे समोर आणणारा असून, आरक्षण या मुद्द्यावर विचारमंथन करणारा असल्याने प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असल्याचं मत दिग्दर्शक इंदरपाल सिंग यांनी व्यक्त केलं आहे. संगीतकार निखिल कामत आणि इंदरपाल सिंग यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..