'गगन सदन तेजोमय' सामाजिक बांधिलकी आणि ध्यासपूर्तीची दिवाळी पहाट!
'गगन सदन तेजोमय' सामाजिक बांधिलकी आणि ध्यासपूर्तीची दिवाळी पहाट!
संत ज्ञानेश्वरांच्या दैवी स्वरांनी मोगरा फुलला!
"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया", मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे यांना 'ध्यास सन्मान' बहाल!
मुंबई - (सांस्कृतिक प्रतिनिधी) : १९ वर्षांपूर्वी दिवाळी पहाट सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा रुजवणाऱ्या 'ॲड फिज'च्या 'गगन सदन तेजोमय'ची यावर्षीची २० वी दिवाळी पहाट विशेष संस्मरणीय ठरली. एक अविस्मरणीय भक्तिरसातील सुमधुर संगीताचे अनोखे पर्व साजरे करत 'मोगऱ्याच्या सुगंधाने ही पहाट अनोखी ठरली. या वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्याने संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विशेष महत्त्व आहे. त्यांच्या रचनांवर आधारित 'मोगरा फुलला' या शब्द-सुरांच्या गंधात रसिक रंगून गेले होते.
समाजातील प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या अनोळखी व्यक्ती व संस्थांना गौरविण्याची परंपरा जपत यावर्षीचे 'गगन सदन तेजोमय'चे 'ध्यास सन्मान' वैद्यकीय सेवा कार्यासाठी समर्पित करण्यात आले होते. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' या सेवाभावी संस्थेला आणि "सेवा हेच जीवन" हे ब्रीदवाक्य समजून आयुष्यभर रुग्णांची सेवा करणाऱ्या मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे (MBBS) यांना ध्यास सन्मानाने गौरवण्यात आले. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते आणि डॉ. अविनाश फडके, डॉ. माधुरी गवांदे या मान्यवरांच्या उपस्थितीत 'ध्यास सन्मान' देण्यात आले. डॉ. सुल्तान प्रधान यांच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चा पुरस्कार त्यांच्या कन्या टीना नायडू यांनी स्वीकारला.
'गगन सदन तेजोमय'च्या 'मोगरा फुलला' या विशेष मैफिलीत श्रीरंग भावे, शाल्मली सुखटणकर यांनी त्यांच्या मधुर आवाजात ज्ञानेश्वरांच्या रचना सादर केल्या. निलेश परब, प्रसाद पाध्ये, शशांक हाडकर, दर्शना जोग, अमोघ दांडेकर, आणि अभय ओक या ख्यातनाम कलाकारांनी वाद्यांची साथ दिली. या मैफिलीत विदुषी धनश्री लेले यांनी अत्यंत सुरेख निरूपणाद्वारे कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणाला सुगंधित बनवले. संत ज्ञानेश्वरांच्या गूढ आणि आध्यात्मिक विचारांनी ओतप्रोत भरलेल्या या अभंगांचा अनुभव त्यांनी आपल्या खास शैलीतून उपस्थितांना दिला. 'ॲड फिज'ची प्रस्तुती असलेल्या या संपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती विनोद पवार तर संयोजन महेंद्र पवार यांचे होते.
Comments
Post a Comment