फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप सिद्ध करू शकलो! -ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम
फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप सिद्ध करू शकलो!
-ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम
मुंबई - (सांस्कृतिक प्रतिनिधी) : नोकरशाही काहीशी गोंधळलेली असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायकतेमुळे ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी डेव्हिड हेडलेला साक्षीदार करून त्याची जबानी घेण्यास तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे कसाब ला फाशी होऊन सुद्धा 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तान चे षड्यंत्र असल्याची जी बाब आपण जगाच्या वेशीवर टांगू शकलो नव्हतो ती त्यांच्या काळात न्यायालयात व्यवस्थित सिद्ध करून पाकिस्तान चे पाप आपण जगासमोर निर्विवादपणे उघड करू शकलो’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले आहे.
माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या युट्यूब चॅनेलवरील ‘नक्की काय चाललंय?’ या पॉडकास्ट मालिकेत उज्ज्वल निकम यांची मुलाखत येत्या सोमवारी प्रकाशित होत असून त्यात निकम यांनी हे खळबळजनक निरीक्षण नोंदविले आहे.
निर्णायक नेतृत्व हे भाजपचे वैशिष्ट्य आहे आणि मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या विषयात मी भाजपामध्ये नसतानाही मला माझ्या सूचनांवर नेहमीच तात्काळ आणि योग्य निर्णय घेतले असे ही उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. राष्ट्र-प्रथम ही मानसिकता असलेले नेतृत्व ज्यावेळी सत्तेत असते तेव्हाच अशी निर्णय क्षमता दिसून येते असे ही निकम यांनी म्हटले आहे.
विनय सहस्रबुद्धे यांनी घेतलेल्या आठ मुलाखतींची एक मालिका येत्या सोमवार पासून ‘नक्की काय चाललंय? या शीर्षकाखाली सुरु होतेय. त्यातील पहिली मुलाखत उज्ज्वल निकम यांची आहे. निकम यांच्या व्यतिरिक्त प्रा. सदानंद मोरे, पोपटराव पवार , पाशा पटेल, स्मृती इराणी, मिलिंद कांबळे आणि काही युवा उद्योजक इत्यादी आठ मान्यवरांच्या मुलाखती या मालिकेतून सादर होणार आहेत. चार नोव्हेंबर पासून एका दिवसाआड एक या पद्धतीने समाज माध्यमांवर सादर होणाऱ्या या मुलाखत मालिकेत विनय सहस्रबुद्धे एका नव्याच भूमिकेत दिसणार आहेत.
‘सध्याच्या राजकीय परिस्थितीत ‘नक्की काय चाललंय?’ या बद्दल लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना विषय तज्ञांकडून उत्तरे मिळवून, नक्की काय झालं आणि नक्की काय व्हायला हवंय हे स्पष्ट करुन मतदारांचे प्रबोधन करण्याचा हा प्रयत्न आहे असे विनय सहस्रबुद्धे यांनी या संदर्भात सांगितले.
या मालिकेच्या शेवटच्या दोन भागात प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती असणार आहेत. चार नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत विविध समाज माध्यम मंचांवर या मुलाखती प्रकाशित होणार आहेत.
Comments
Post a Comment