एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा कार्लोस पेना
१६ एप्रिल : एफसी गोवाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्लोस पेना यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे. एक खेळाडू म्हणूनही त्यांनी गोवा क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच क्लबला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
एफसी गोवा क्लबसोबत पुन्हा जॉइन होण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा निर्णय घेणे सोपे होते. स्पेनमध्ये कार्यरत असताना मला अनेक क्लबच्या ऑफर आल्या. मात्र, एफसी गोवाची जबाबदारी स्वीकारायला मी प्राधान्य दिले. गेली दोन वर्षे युथ टीमचा सहप्रशिक्षकपदी राहिल्यानंतर हेड कोच म्हणून काम करण्याची ही योग्य संधी आहे, असे मला वाटते. त्यामुळे एफसी गोवाची आपसूक निवड केली, असे स्पेनच्या पेना यांनी क्लबसोबतच्या करारानंतर एफसीगोवाडॉटइनला सांगितले. ३८ वर्षीय पेना हे युइएफए प्रो लायसन्स होल्डर कोच असून मागील हंगामात त्यांनी अल्बासीटे बॅलोम्पी युथ टीमचे प्रशिक्षकपद भूषवले होते.
एससी गोवासोबतच्या ऋणानुबंधांबाबत विचारले असता, एफसी गोवा क्लबसोबत माझे जुने आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत. क्लबच्या अनेक ऐतिहासिक आठवणींशी मी जोडला गेलो आहे. एफसी गोवाला नंबर वन क्लब बनवण्याला माझे प्राधान्य असेल. त्यादृष्टीने मी प्रयत्न करेन. माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत एफसी गोवा संघाची कामगिरी बहारदार होईल, असा मला विश्वास वाटतो. त्यादृष्टीने मी योजना आखेन, असे पेना यांनी म्हटले.
कार्लोस पेना यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीनंतर एफसी गोवा क्लबचे प्रेसिडेंट अक्षय टंडन यांनी आनंद व्यक्त केला आहे. क्लबचे हेड कोच म्हणून पेना यांच्या निवडीचे मी स्वागत करतो. कार्लोस हे चांगले लीडर आहेत. तसेच फुटबॉल खेळाचे खरेखुरे विद्यार्थी (स्टुडंट) आहेत. एफसी गोवा क्लबचा इतिहास आणि क्लबबाबत त्यांना संपूर्ण ज्ञान आहे. शिवाय खेळाडू तसेच सहप्रशिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून त्यांना खेळाचा मोठा अनुभव आहे. एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवताना ते सर्व अनुभव आणि कौशल्य पणाला लावतील, असा मला विश्वास वाटतो.
पेना यांची खेळाडू (प्लेअर) म्हणूनही चांगली कारकीर्द होती. दोन वर्षे एफसी गोवाकडून खेळताना त्यांनी छाप पाडली. क्लबच्या जेतेपदामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला. एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आता मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारतोय, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. एफसी गोवाला चांगले यश मिळण्यासाठी पेना आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला व्यवस्थापनाकडून (मॅनेजमेंट) सर्वतोपरी सहकार्य असेल, असे टंडन पुढे म्हणाले.
पेना यांनी २०१९-२० हंगामात खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली. युइएफए प्रो लायसन्स होल्डर असलेल्या पेना यांनी त्यानंतर दोन वर्षे स्पेनमध्ये लॉर्का युथ टीम आणि युकॅम मुर्सिया या आंतरराष्ट्रीय क्लबचे कोच म्हणून काम पाहिले.
त्यानंतर २०२०-२१ हंगामात लिडा इस्पॉर्टियूच्या सीनियर संघाचे सहप्रशिक्षकपद भूषवले. त्यामुळे एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली.
खेळाडू म्हणून चांगली कारकीर्द कार्लोस पेना यांची जडणघडण एफसी बार्सिलोनामधून झाली आहे. बार्सिलोना सी आणि बी संघातून खेळल्यानंतर ते अल्बासीटे क्लबला जॉइन झाले. त्या क्लबचे चार वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर डिफेंडर पेना यांनी रिक्रिटिव्हो डी ह्युइल्वा क्लबचे एक वर्ष प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०१०मध्ये रेआल व्हॅलाडॉलिड क्लबमध्ये दाखल झाले.
रेआल व्हॅलाडॉलिड क्लबमध्ये पाच वर्षे खेळताना ते ला लिगा स्पर्धेतही परतले. पेना यांनी ओव्हिएडो, गेटॅफे आणि लॉर्का एफसीचेही प्रतिनिधित्व केले. २०१८मध्ये ते आयएलएलमधील एक प्रसिद्ध क्लब असलेल्या एफसी गोवा क्लबसोबत करारबद्ध झाले.
एफसी गोवाकडून खेळताना पहिल्याच हंगामात क्लबने आयएसएलच्या फायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर पुढील वर्षी (२०१९) सुपर कपवर नाव कोरले. २०१९-२०मध्ये एफसी गोवा क्लब हा एएफसी चॅम्पियन्स लीगच्या ग्रुप स्टेजसाठी पात्र होणारा भारतातील पहिला क्लब ठरला. त्यात स्पेनच्या कार्लोस पेना यांचा मोठा वाटा आहे.
पेना यांनी खेळाडू म्हणून ४३ सामन्यांत एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केले आहे.
Comments
Post a Comment