‘बापल्योक’ शुक्रवारी भेटीला..
‘बापल्योक’ शुक्रवारी भेटीला
‘नातं’ या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. माणसाच्या आयुष्यात कित्येकदा नात्याला वळण देणाऱ्या घटना घडतात, या घटनांमधून नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना, त्यावेळी नातं जास्त न ताणता हुडकायचा प्रयत्न करायचा. अशाने नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. हेच सांगू पाहणारा दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘बापल्योक’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, याचा सुरेख मेळ ‘बापल्योक’ या चित्रपटातून साधला आहे. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत.
‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे. ध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहे. वेशभूषा अनुत्तमा नायकवडी तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत. रंगभूषा संतोष डोंगरे, कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत. लाईन प्रोडक्शनची जबाबदारी बहुरूपी प्रोडक्शन्सने सांभाळली आहे.
Comments
Post a Comment