अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर
राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'वीर मुरारबाजी' मध्ये झळकणार
अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर
जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली 'रामायण' ही मालिका प्रचंड गाजली. विशेषतः राम आणि सीतेच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले. या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा पटकावली. या राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.
पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्यदिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडणारा ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास बघता यावा यासाठी आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ही चित्ररूपी चळवळ उभारली आहे. ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे. उच्च निर्मितीमूल्य, दर्जेदार तंत्रज् आणि त्याला असलेली उत्तोमोत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
Comments
Post a Comment