‘समुपदेशक’ पुष्कर श्रोत्री
अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या 'हॅप्पी गो लकी' स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता ‘समुपदेशक’ म्हणून काम करणार आहे. गैरसमजामुळे विस्कटलेल्या नात्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याच्या कामासाठी पुष्करने पुढाकार घेतला आहे. समुपदेशक म्हणून त्याची नवी इनिंग यशस्वी होते का? हे पाहण्यासाठी तुम्हाला आगामी ‘३६ गुण’ हा मराठी चित्रपट पहावा लागेल. या चित्रपटात तो समुपदेशकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्करचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना यात पहायला मिळेल. समित कक्कड दिग्दर्शित '३६ गुण' चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पुष्कर सांगतो की, ‘समुपदेशक’ सुसंवादासाठी प्रयत्न करतोच पण त्याच्या या प्रयत्नाला समोरच्याचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा असतो. कोणत्याही नात्यामध्ये मनं जुळायला हवीत. ती जुळली की, नात्याचा समतोल साधला जातो, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा.
या चित्रपटात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत. ‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.
Comments
Post a Comment