'सातारचा सलमान'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित 

चित्रपटात झळकणार मराठीतील नामवंत चेहरे

आपणही मोठ्या पडद्यावर झळकावे, हिरो बनावे, असे स्वप्न आपल्यापैकी अनेक जण बघतात. काहींचे सत्यात उतरते तर काहींचे स्वप्नच राहते. असेच हिरो बनण्याचे स्वप्न एका खेड्यातील सामान्य तरुणाने पाहिले आहे. 'स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात!' अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची त्याची धडपड आणि अखेर त्याचे त्याची स्वप्नपूर्ती होते का? हे आपल्याला येत्या ३ मार्च रोजी समजणार आहे. प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रदर्शित ‘सातारचा सलमान' या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत यांचीही झलक दिसत आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट धमाल मनोरंजक असणार याचा अंदाज ट्रेलरवरूनच येत आहे. 

ट्रेलरमध्ये साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघतोय. ते पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास, या प्रवासात त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी केलेली मदत यात दिसत आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आलेले हे चढउतार त्याला कोणत्या वळणावर नेणार आणि त्याच्या समोर आलेली परिस्थिती त्याला खरंच हिरो बनवणार का, याचे उत्तर मात्र 'सातारचा सलमान' पाहिल्यावरच मिळणार आहे. 
 
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात मोठं होण्याचं स्वप्न बघत असतो आणि या प्रवासात प्रत्येकाच्याच वाटेवर अनेक अडचणी येतात. कधीकधी अशी वेळही येते की, आता सगळं संपलं, असं वाटतं. मात्र आपण वाईटातूनही काही चांगलं बघितलं पाहिजे आणि आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहणे खूप गरजेचं आहे. आपण आपलं काम करत राहावं, त्यातूनच काहीतरी चांगलं निष्पन्न होतं, ही ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे. हा एक धमाल, निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे, जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटेल.''

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight