'मिशन अयोध्या'चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन!

'मिशन अयोध्या'चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन !

मुंबई, (संगीत प्रतिनिधी):अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा अतिशय ग्लॅमरस आणि भव्य कॅनव्हासवर आज थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून अयोध्यातील लोकप्रिय 'साधो बँड'ला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या रामलल्लाच्या भक्तीगीतांनी सारा परिसर प्रसन्न झाला होता. या मंगल प्रसंगी अयोध्या मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचे, प्रख्यात आर्टिस्ट विनय गावडे यांनी काढलेले अप्रतिम स्केच निर्माते कृष्णा दादाराव शिंदे व योगिता कृष्णा शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची प्रेरणा व अनुभव कथन केले.

'रामराया' आणि 'श्रीराम अँथम'ची जादू!

या सोहळ्यात भव्य एलईडी वॉल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सादर झालेल्या रामलल्लाच्या सूरमयी मोहक रूपाने संपूर्ण उपस्थितांना राममय करून टाकले. या अद्वितीय सादरीकरणाने ऑडिटोरियम मधील रसिक प्रेक्षक भक्तिरसाने भारावून गेला, आणि 'मिशन अयोध्या'च्या संगीत प्रकाशन सोहळ्याबद्दल सर्वांच्या मनात अपार कुतूहल व उत्कंठा निर्माण झाली. लोकप्रिय गायक जावेद अली यांच्या सुमधुर आवाजातील 'रामराया रामराया' या अप्रतिम गीताला संगीतकार एस. डी. सदगुरु यांनी तितक्याच खुबीने सादर केले, ज्यामुळे वन्स मोअरचा गजर झाला. प्रेक्षकांनी गीताच्या ठेक्यावर ताल धरत ऑडिटोरियम अक्षरशः दणाणून सोडले. यानंतर सादर केलेल्या 'श्रीराम अँथम'ने वातावरणात भारावून सोडले. प्रभू श्रीरामांवर आधारित हे अत्यंत प्रेरणादायी अँथम सॉंग प्रेक्षकांच्या हृदयाला भिडले, आणि संपूर्ण सभागृहात मंगलमयतेची अनुभूती निर्माण झाली.

सुरेल योगायोग!

दिवंगत लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्षे देशात मोठ्या उत्साहात साजरे होत असताना, ‘मिशन अयोध्या’च्या निमित्ताने एक खास आणि सुरेल योग जुळून आला आहे. रफी साहेबांच्या दिव्य स्वरांनी अजरामर झालेल्या 'सरगम' चित्रपटातील ‘रामजी की निकली सवारी’ या प्रभू श्रीरामांच्या भक्तिपूर्ण गीताची आठवण होईल, अश्या स्वरांची जादू निर्माण करणारे 'रामराया रामराया' हे भावमधुर गीत ‘मिशन अयोध्या’ चित्रपटात आहे. हा सुमधुर गीतसंगीताचा योगायोग आणखी एका वेगळ्या कारणाने विशेष म्हणता येईल आणि ते म्हणजे या ही गाण्याला मुस्लिम धर्मीय गायकाचा आवाज. लोकप्रिय गायक जावेद अली यांच्या भावपूर्ण आवाजात 'रामराया रामराया' ध्वनिमुद्रित झाले आहे, ज्यामुळे हा क्षण सांप्रदायिक ऐक्य आणि कलात्मकतेचा अनोखा संगम म्हणता येईल.

कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात प्रथमच चित्रपटातील दोन प्रमुख व्यक्तिरेखा देशमुख सर, विचारे यांची एंट्रीच भन्नाट कल्पकतेने करण्यात आली होती. खचाखच भरलेल्या ऑडिटोरियममध्ये चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण संवाद म्हणत रुबाबात झालेल्या त्यांच्या एंट्रीची झलक पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यामुळे हा सिनेमा चित्रपटगृहात पाहण्याची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.

संगीत, कथा, आणि तांत्रिक कौशल्याची सांगड

चित्रपटात एकूण दोन गाणी असून, त्यांचे गीतलेखन अभिजित जोशी, पूर्वा ठोसर, आणि समीर रमेश सुर्वे यांनी केले आहे. संगीतकार एस. डी. सदगुरु यांनी संगीतबद्ध केलेल्या 'रामराया रामराया' या गाण्याला जावेद अली यांचा स्वरसाज लाभला आहे, तर 'श्रीराम अँथम' या गाण्याने समूहनिर्मित भक्तिगीताला गीत : रामराया रामराया कोरस : विवेक नाईक, राहुल चिटणीस, अनिल भिलारे, सोनल नाईक, वीणा जोशी, मयुरी कुडाळकर, कोरस (मुलं) वेदान बांदल, सार्थक खोब्रेकर, श्राव्या गोठिवरेकर, समर बापट, गीत : रामगीत कोरस : विवेक नाईक, राहुल चिटणीस, संतोष बोटे, मंगेश शिर्के, करण कागले, अनिल भिलारे, कोरस गीत: श्रीराम कोरस : स्वरा जाधव, प्रांजल साळुंके, पृथ्वीराज सावंत, स्वप्निल कानाडे, संस्कृती शिरगांवकर, सृष्टी शिरगांवकर, वैष्णवी धामणस्कर, आरोही मघाडे (प्रबोधन कुर्ला शाळेचे विद्यार्थी) या गायकांनी स्वरसाज दिला आहे. सिनेमॅटोग्राफी नजीर खान यांनी समर्थपणे हाताळली असून पार्श्वसंगीत निलेश डहाणूकर यांनी दिले आहे.

संगीतकार एस. डी. सदगुरु यांचे मनोगत

"‘मिशन अयोध्या’सारख्या भव्य आणि भावनिक चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून माझ्या करिअरची सुरुवात होणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेची सुरुवात थेट संगीत लोकार्पण सोहळ्याद्वारे होणे, हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे, या चित्रपटासाठी संगीत देताना माझ्या मनात असलेला भक्तीभाव प्रत्येक सुरांत आणि चालीत प्रतिबिंबित झाला आहे. लोकप्रिय गायक जावेद अली यांच्यासह प्रतिभावान गीतकार अभिजित जोशी, पूर्वा ठोसर, आणि समीर रमेश सुर्वे यांच्या गाण्यांचे शब्द आणि चाली विलक्षण असून चित्रपटाच्या भावनात्मक कथानकाला तंतोतंत साजेशा आहेत." असे संगीत दिग्दर्शक एस. डी. सदगुरु यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

‘मिशन अयोध्या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात दमदार पदार्पण करणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’चे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांनी प्रदर्शनपूर्व प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "‘मिशन अयोध्या’मधील सर्व गाणी अद्वितीय आणि हृदयाला भिडणारी झाली आहेत. रसिकांच्या मनावर या गाण्यांनी राज्य करावे, अशी त्यांची निर्मिती झाली आहे. गायक, तंत्रज्ञ आणि कलावंतांनी या कलाकृतीसाठी अतिशय जिद्दीने आणि मनापासून मेहनत घेतली आहे. ही कलाकृती भक्तिमय वातावरणात प्रदर्शित होत आहे, आणि त्यामुळेच असे वाटते की प्रभू श्रीरामांचा कृपाशीर्वाद या चित्रपटावर आहे."

या चित्रपटाविषयी बोलताना लेखक-दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे म्हणाले, "मिशन अयोध्या’ हा चित्रपट फक्त एक कथा नाही, तर एक भावनिक आणि आव्हानात्मक प्रवास आहे. चित्रपटातील सर्व गाणी अद्वितीय आणि दर्जेदार असून, विलक्षण कथानक आणि प्रभावी सादरीकरणामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या पाठबळामुळे, तसेच कलावंत, गायक, आणि तंत्रज्ञांच्या अथकसाथीमुळे हा प्रवास अविस्मरणीय झाला आहे. प्रसिद्धी मोहिमेची सुरुवात ज्या भक्तिमय वातावरणात झाली, त्याने आम्हाला प्रचंड ऊर्जा दिली आहे."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K