मैत्रीच्या अनोख्या दुनियेची सफर घडवणारं ‘मैत्रेया’
मैत्रीच्या अनोख्या दुनियेची सफर घडवणारं ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित!
मस्ती आणि प्रेमाच्या रंगांनी सजलेल्या या गाण्याला सिद्धांत भोसले - क्रांती रेडकर यांच्या आवाजाची साथ!
मैत्री म्हणजे नुसती सोबत नाही, तर एकमेकांसोबत केलेली धमाल, मनमोकळ्या गप्पा, खोड्या, रुसवे-फुगवे आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा असंख्य आठवणी! मैत्रीच्या याच अनोख्या दुनियेची सफर घडवणारं ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मित्र- मैत्रिणींसोबतच्या बेधुंद क्षणांपासून प्रेमाच्या हळुवार भावनांपर्यंतचे विविध रंग उलगडणारं हे गाणं तरुणाईच्या भावविश्वाशी नातं जोडणारं आहे. मैत्रीचा मोकळेपणा, एकत्र असण्याचा आनंद आणि नात्यांमधून फुलणारा जिव्हाळा यांची सुंदर गुंफण या गाण्यात पाहायला मिळते.
मित्रांसोबत केलेली मजा, एकमेकांची खेचलेली फिरकी, छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चेष्टामस्करी आणि प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभं राहाण्याची भावना अशा मैत्रीच्या अनेक छटा या टायटल साँगमधून अनुभवायला मिळतात. या धमाल-मस्तीच्या वातावरणात प्रेमाचीही हळुवार झलक पाहायला मिळते. मैत्रीच्या नात्यात सहजपणे फुलणारं प्रेम आणि एकत्र घालवलेल्या क्षणांतून निर्माण होणाऱ्या आठवणी यांमुळे गाण्याला वेगळीच रंगत आली आहे. सिद्धांत भोसले आणि क्रांती रेडकर यांच्या आवाजाने सजलेल्या या गाण्याचे बोल ओंकार मंगेश दत्त यांचे असून पंकज पडघण यांनी त्याला संगीत दिलं आहे. गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने क्रांती रेडकरने पहिल्यांदाच रॅप लिहिलं आणि गायलं आहे. संगीत, शब्द आणि आवाज यांचा सुरेख मेळ साधणारं हे गाणं प्रेक्षकांना मैत्रीच्या खास विश्वात घेऊन जाणारं आहे.
संगीतकार पंकज पडघण म्हणतात, “मैत्रीच्या नात्यात एक वेगळीच ऊर्जा आणि सहजता असते. मित्रांसोबतची धमाल, मस्ती, एकमेकांची चेष्टा आणि या सगळ्यातून निर्माण होणारा जिव्हाळा हे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतात. ‘मैत्रेया’च्या टायटल साँगमधून मैत्रीचा हाच उत्साह आणि तरुणाईचा आनंद संगीताच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याचे शब्द आणि त्यातील भावना यांना साजेसं संगीत देताना त्यातला खेळकरपणा आणि भावनिक ओलावा जपण्यावर भर दिला. हे गाणं ऐकताना प्रेक्षकांना आपल्या मित्रांसोबतच्या आठवणी पुन्हा अनुभवता येतील, अशी आशा आहे.”
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “मैत्री आणि प्रेम ही आयुष्यातील अशी नाती आहेत, जी आपल्या जगण्यात आनंदाचे अनेक रंग भरतात. मित्रांसोबत केलेली धमाल, एकमेकांना चिडवणं, एकत्र घालवलेले क्षण आणि नकळत निर्माण होणारी भावनिक जवळीक या सगळ्याच गोष्टी खास असतात. ‘मैत्रेया’च्या टायटल साँगमधून मैत्रीची ही अनोखी दुनिया आणि त्यातील निरागस आनंद प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”
निर्माते मनोज खळतकर म्हणतात, “मित्रांसोबतच्या आठवणी या प्रत्येकाच्या आयुष्यातील अनमोल ठेवा असतात. कधी हसवणारे, कधी भावूक करणारे, तर कधी आयुष्यभर चेहऱ्यावर हसू आणणारे हे क्षण आपल्या नात्यांना अधिक घट्ट करतात. ‘मैत्रेया’च्या टायटल साँगमधून मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या उत्साही जगण्याचं प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं पाहाताना प्रेक्षकांना आपल्या मित्रांची आणि त्यांच्यासोबतच्या अविस्मरणीय क्षणांची नक्कीच आठवण होईल.”
समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर चित्रपटाचे निर्माते असून, अमन खळतकर सहनिर्माते आहेत. या चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या आयुष्यातील नात्यांचे विविध रंग उलगडणारा ‘मैत्रेया’ येत्या २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Post a Comment